

Purna Taluka crop damage cloudburst heavy rainfall
आनंद ढोणे
पूर्णा: तालुक्यातील लिमला, ताडकळस, वझूर महसूल मंडळात गुरूवारी (दि. १४) मध्यरात्री अचानक वादळी वाऱ्यासह ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी झाली. मुसळधार पावसामुळे शेतशिवारातील हळद, कापूस, ऊस, सोयाबीन, तूर, मुग, उडिद ही पिके अक्षरशः गाळमातीसह उपटून वाहून गेली. नदीकाठच्या दोन्ही बाजूंची पिकं कुठं वाहून गेली, तर कुठे पाण्याखाली जाऊन पूर्णपणे बाधित झाली. सकाळी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांना होत्याचं नव्हतं झालेलं भयाण वास्तव दिसलं. शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले "आता जगायचं कसं?" असा प्रश्न त्यांच्या मनात घर करून राहिला आहे.
या ढगफुटीमुळे माहेर, बानेगाव, धानोरा काळे, माखणी, फुलकळस, लिमला आदी गावांमध्ये एकच हाहाकार माजला. रात्री एक-दिड वाजता सुरू झालेला पाऊस पहाटेपर्यंत सुरू राहिला. चार तासांच्या मुसळधार पावसाने नदीनाले ओसंडून वाहू लागले. शेतातील पिके, चारा, वैरणीच्या सुड्या वाहून गेल्या. काही ठिकाणी पशुधनही वाहून गेल्याची माहिती आहे. दोन दिवसांपासून अनेक शेतकऱ्यांच्या घरात चूल पेटलेली नाही. लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याने कुटुंबातील सदस्यांनाही दोन घास जात नाहीत. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता, निराशा आणि असहायतेचं सावट स्पष्ट दिसत आहे.
या नैसर्गिक आपत्तीतून सावरायचं कसं, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे निकष बदलल्याने ढगफुटी, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई मिळेल का, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. अनेक शेतकऱ्यांचे दावे रिजेक्ट होत असल्याची तक्रार आहे. सरकारकडून मदतीची अपेक्षा असली, तरी ती किती आणि केव्हा मिळेल, याबाबत अनिश्चितता आहे. "देवानं दिलेलं सरनां अन् माणसानं देलेलं पुरनां," असं म्हणत शेतकरी मनस्वी पुटपुटत आहेत. अजूनही पाऊस सुरू असल्याने आणखी आपत्ती ओढावेल की, या भीतीने शेतकरी औटघटका मोजत आहेत.
या आपत्तीत शेतकऱ्यांचे फक्त पिकांचेच नव्हे, तर कुटुंबाच्या जगण्यावरचं संकट गडद झालं आहे. वर्षभराचा सणवार, घरखर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा?, या चिंता शेतकऱ्यांच्या मनात खोलवर घर करून राहिल्या आहेत. निसर्गाच्या या कोपामुळे शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाले आहेत.