

मानवत : भारतीय जनता पक्षाच्या वतीने मला परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाल्याने कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत, पालकमंत्री पदाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू केले आहेत अशी ग्वाही जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली.
शहरातील रेणुका मंगल कार्यालयात मानवत तालुका भाजपच्या वतीने संघटनात्मक बैठक व नागरिक संवाद या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारने विविध विकास योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा कसा विकास केला हे उदाहरणासह सांगत विविध घरकुल व आवास योजना, स्वच्छालय, एक रुपयातील पिक विमा, मुद्रा लोन, लाडकी बहीण, शेततळे, सोलर, शेतकऱ्यांना मोफत वीज अशा अनेक योजनांचा उल्लेख केला. पिक विमा योजनेतून जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 3700 कोटी रुपये जमा झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच पाकिस्तानातील अतिरेक्याच्या विरोधात राबवल्या ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला.
भाजपाचा सेवा हाच धर्म हा मंत्र असल्याचे त्यांनी सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचे कौतुक केले. गुजरात मध्ये झालेल्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी कोणत्याही प्रकारचे हार तुरे न स्वीकारता मृतात्म्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमात शहरातील विविध महिला संघटना व इतर सामाजिक संघटनांच्या वतीने मेघना बोर्डीकरांचा विविध झाडांचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.
व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, डॉ उमेश देशमुख, विलास बाबर, प्रा पंडित लांडगे, कीर्ती कत्रूवार, उद्धव नाईक, सुभाष जाधव, हरिभाऊ निर्मळ, संतोष हंचाटे आदिजण उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक प्रा अनंत गोलाईत यांनी तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ शिवराज नाईक यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.