

धुळे : धुळे शहर व ग्रामीण तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील विजेच्या प्रलंबित कामांना गती देऊन ती तातडीने पूर्ण करावीत. तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी निरंतर वीज योजनेतून जास्तीत जास्त रोहित्र उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले.
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी निर्मल भवन येथे बैठकीत धुळे शहर व धुळे ग्रामीणचा आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुका येथील ऊर्जा विषयक प्रश्नांच्या अनुषंगाने आढावा घेतला. यावेळी आमदार अनुप अग्रवाल, आमदार राघवेंद्र पाटील, आमदार मोनिका राजळे, संचालक अरविंद बाधिकर, संचलन व सुव्यवस्था महापारेषण संचालक सतिश चव्हाण, प्रकल्प महावितरण संचालक प्रसाद रेशमे, मुख्य अभियंता महापारेषण संजीव घोळे, अधीक्षक अभियंता प्रकाश लिमकर, भुसावळ मंडळ महापारेषणचे अधीक्षक अभियंता मनीष खत्री, अधीक्षक अभियंता उदय येवले, महावितरणचे अधीक्षक अभियंता रमेश पवार उपस्थित होते.
राज्यमंत्री बोर्डीकर म्हणाल्या की, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी धुळे जिल्ह्यातील वीजपुरवठा सुधारण्याच्या उपाययोजनांवर तातडीने काम करावे. महापारेषणने धुळे ग्रामीण येथील बोरिस व शिरूर येथे 132 के.व्ही. चे दोन उपकेंद्र तात्काळ प्रस्तावित करावीत. तसेच धुळे शहरातील एमआयडीसी जवळील अतिरिक्त जागा उपलब्ध होऊन एमआयडीसीचे वाढीव क्षेत्र निर्माण होत असून उद्योगांची उभारणी होत आहे या दृष्टीने एमआयडीसी लगत 132 के.व्हीचे उपकेंद्राचा प्रस्तावही तात्काळ मार्गी लावावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
धुळे शहरात काही ठिकाणी विजेच्या तारा उंच इमारतीला चिकटलेल्या असल्याने धोकादायक स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ए.बी. केबलसाठी निधीची तरतूद करण्यात यावी. तसेच धुळे शहर व ग्रामीण भागातील व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील पावसाळ्यापूर्वी विद्युत देखभाल दुरुस्तीची कामे तातडीने करण्यात यावी. वीज गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी वीज चोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी दिले.कुसुम योजनेची प्रलंबित कामे व मागील त्याला सौर कृषी पंप योजनेची कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
एमआयडीसीला लागून 132 केव्ही सब स्टेशन करण्याचे निर्णय घेण्यात आला. तसेच एमआयडीसीला वीस पुरवठा करणारा एकच फिडर 33 केव्ही चा असल्याने त्याला पर्यायी फिडर निर्मितीसाठी दोन कोटीचा निधी देऊन या ठिकाणी पर्यायी फिडर निर्मितीचा देखील निर्णय झाला. या बैठकीमध्ये एमआयडीसीच्या उद्योजकांना तेथे वाहिनीवरून वीज पुरवठा घेण्यासाठी काही उद्योजक इच्छुक आहेत. त्यांच्यासाठी 132 केव्ही चा सबस्टेशन करणे गरजेचे आहे. या मुद्द्याची देखील चर्चा झाली. सबस्टेशन साठी या मुद्द्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यावेळी शहरातील लघुदाब वाहिनीच्या जागेवर 120 स्क्वेअर एम एम - ए बी केबल तथा कोटेड कंडक्टरच्या माध्यमातून वीज वाहिनी करण्यात यावी, जेणेकरून कोणाचे जीवितास धोका निर्माण होणार नाही. तसेच लोकांची सोय होईल .शहरासाठी सुमारे 100 ट्रान्सफॉर्मर निरंतर वीज योजनेअंतर्गत देण्याचा निर्णय झाला.
डिस्ट्रीब्यूशन बॉक्स तसेच केबल बदलण्यासाठी देखील किमान 200 डिस्ट्रीब्यूशन बॉक्स व केबल बदलण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन राज्यमंत्री यांनी दिला. या बैठकीमध्ये सर्व शहरा साठी एक भूमिगत डीपी वाहिनी करण्यासाठी एक डीपीआर बनवून सदर डीपीआरला टप्प्याटप्प्याने निधी देण्याबाबत विचार करण्याबाबत देखील चर्चा झाली. धुळे एमआयडीसी सबस्टेशन मध्ये पाच एम बी चे तीन ट्रान्सफॉर्मर आहे. सदर ट्रान्सफॉर्मरची क्षमता ही परिपूर्ण झालेली असल्याने नवीन विद्युत प्रवाह देण्यासाठी क्षमता उपलब्ध नसल्याने पाच एमबी चे तिघे ट्रान्सफॉर्मचे रूपांतर दहा एमबीमध्ये करण्यात येईल. व रूपांतर करण्यासाठीचा निधी माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल. ज्या फिडरवर विज चोरीचे प्रमाण अधिक आहे. सदर विज चोरी थांबवण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करून सदर ठिकाणी वीज चोरीची कारवाई करण्यासंदर्भात देखील चर्चा झाली. शहरात प्री मान्सून मेंटेनन्स करण्यात संदर्भात मंत्री यांनी आपल्या स्तरावरून निर्देश दिले. त्याबाबत आमदार यांनी विनंतीला मान्यता दिली. व एमएसईबीच्या अधिकाऱ्यांना त्वरित करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.