

मानवत : सद्य परिस्थितीत मुलींच्या अपेक्षा वाढल्याने मुलांची लग्न होणे अवघड झाले आहे. असे असताना मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील एका युवकाने चक्क जपानच्या टोकीयो शहरातील एका युवतीशी लग्नाचा बार उडविला आहे. ह्या अनोख्या लग्नाची गावात चर्चा रंगली आहे.
९० च्या दशकातील बहुतेक जणांनी प्रा. लक्ष्मण देशपांडे यांचे 'वऱ्हाड निघाले लंडनला' हे एक पात्री प्रयोगाचे नाटक ऐकले व पाहिले होते. परंतू, आता मात्र परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यातील एका तरुणानं वऱ्हाड निघाले लंडनला याला फाटा देत वऱ्हाड आलंय टोकिओहून याची प्रचिती जिल्ह्याला दिली.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून आलेल्या तरुणाने मेहनतीच्या बळावर उच्चशिक्षण केले. चांगल्या आयटी कंपनीत नोकरीही लागली. याच कंपनीच्या कामानिमित्त तरुण जपानला गेला. जपानमधील टोकियो शहरात कंपनीत काम करत असताना त्याच भागात कॉर्पोरेशन लोकल बॉडीमध्ये गव्हर्नमेंट ऑफिसर असलेल्या तरुणीसोबत कामानिमित्ताने ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. काही दिवसांनी परभणीच्या तरुणानं जपानमधील दुसरी कंपनी जॉईन केली. तर जपानच्या तरुणीला भारतीय संस्कृतीबद्दल विशेष आकर्षण असल्याने अधून-मधून त्या विषयावर चर्चा व्हायची. दोघांनी लग्न करायचं ठरवलं आणि आपापल्या कुटुंबियांना निर्णय कळवला.
नुकताच दोघांचा विवाह सोहळा थाटात पार पडला. एवढे लोक पाहून वधूच्या आई-वडिलांना आश्चर्यच वाटलं. कारण त्यांच्याकडं कोणत्याही कार्यक्रमाला मोजकीच माणसं येतात. भारतात ग्रामीण भागात छोटी गावं म्हणजे एक कुटुंबच असतं, असं त्यांना सांगण्यात आलं. सातासमुद्रापार जन्म झाला असला तरी आता जन्मोजन्मी एकत्र राहायचं हे वचन वर-वधूने एकमेकांना दिले.