रियाध : अनेकदा आपण सोशल मीडियावर अनेक विचित्र फोटो किंवा व्हिडीओज व्हायरल झालेले पाहतो. मात्र, यात काही पोस्ट अशादेखील असतात, ज्या आपल्याला वेगळा विचार करायला भाग पाडतात. अशीच एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला फोटो हा एका सौदी अरेबियातील जोडप्याच्या लग्नाचा फोटो आहे, ज्याच्यामुळे ते आता चर्चेत आहेत. आता विचार करत असाल की या लग्नात इतके काय खास होते की ते चर्चेत होते. याचे कारण म्हणजे त्यांनी खोल निळ्याशार समुद्राच्या आत पाण्यात विवाह सोहळा आयोजित केला. समुद्राखालील त्यांच्या या आगळ्यावेगळ्या लग्नाचा फोटो आता व्हायरल होत आहे.
या लग्नाच्या बातम्या अनेक मीडिया रिपोर्टस्मध्ये आल्या आहेत. हे जोडपे डायव्हर्स आहे आणि त्यांना त्यांचे लग्न एका अनोख्या पद्धतीने करायचे होते. आपले प्रेम सिद्ध करण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात, कोणी महागड्या भेटवस्तू देतात, तर कोणी आपले लग्न खास बनवण्यासाठी डेस्टिनेशन वेडिंग करतात. परंतु, या जोडप्याने आपल्या लग्नासाठी एक अनोखी पद्धत निवडली आहे. ही पद्धत आता सोशल मीडियावर चर्चेही विषय ठरत आहे. सध्या व्हायरल होत असलेला विवाह सोहळा आपण क्विचितच कुठे पाहिला असेल. हसन अबू अल-ओला आणि यास्मिन दफ्तरदार या सौदी अरेबियाच्या जोडप्याने अलीकडेच निळ्याशार समुद्रात पाण्याखाली लग्न केले. या अनोख्या लग्नात जोडप्याचे जवळचे मित्र, गोताखोरही सहभागी झाल्याचे गल्फ न्यूजने सांगितले. कॅप्टन फैसल फ्लॅम्बन यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक डायव्हर्सच्या गटाने सौदी डायव्हर्सने या लग्नाचे आयोजन केले होते. गल्फ न्यूजशी आपला अनुभव शेअर करताना अबू ओला म्हणाला, आम्ही तयार झाल्यानंतर कॅप्टन फैसल आणि टीमने आम्हाला सांगितले की त्यांनी समुद्राखाली आमचे लग्न साजरे करण्याची योजना आखली होती. तो एक सुंदर आणि अविस्मरणीय अनुभव होता. या अनोख्या लग्नाचा फोटो एक्स अकाऊंटवर शेअर केला असून, तो आता वेगाने व्हायरल होत आहे.