

Gangakhed Stolen Bullocks Sale Attempt
गंगाखेड : गंगाखेड शहरात शनिवारी भरत असलेल्या आठवडी बैल बाजारात चोरीचे दोन बैल विक्रीसाठी आणल्याचा प्रकार उघडकीस आला. शेजारील शेतकऱ्याचे बैल चोरून पिकअप वाहनातून विक्रीसाठी आणणाऱ्या दोघांना नागरिकांनी पकडून गंगाखेड पोलिसांच्या स्वाधीन केले. पुढील कारवाईसाठी दोन्ही आरोपींना मानवत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मानवत तालुक्यातील उक्कलगाव येथील कार्तिक उक्कलकर याने शेजारील शेतकऱ्यांचे दोन बैल चोरल्याची माहिती समोर आली आहे. हे बैल पिकअप वाहनातून गंगाखेड येथील शनिवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात विक्रीसाठी आणण्यात आले होते. मात्र, बाजारात बैल विक्रीसाठी आणल्यानंतर ते चोरीचे असल्याचा संशय नागरिकांना आला. मिळालेल्या माहितीनुसार दोन बैल सात ऑगस्ट रोजी हरवले असल्याची माहिती मिळाली आहे. या संशयावरून आरोपींना पकडण्यात आले.
नागरिकांनी याबाबत चौकशी केल्यानंतर प्रकार उघडकीस आला. त्यानंतर नागरिकांनी आरोपी कार्तिक उक्कलकर तसेच पिकअप चालक अर्जुन क्षीरसागर यांना पकडून गंगाखेड पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी बैल कुठून आणण्यात आले, याबाबत दोघांकडे चौकशी केली.सदर बैल मानवत तालुक्यातील असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गंगाखेड पोलिसांनी मानवत पोलिसांशी संपर्क साधला.
त्यानंतर दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी मानवत पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. मानवत पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली.
दरम्यान, शेजारील शेतकऱ्यांचे बैल चोरून थेट आठवडी बाजारात विक्रीसाठी आणल्याचा प्रकार समोर आल्याने शेतकरी व बाजारातील व्यापाऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.