चारठाणा : विहीरीतील पाण्याची मोटार सोडत असताना तोल जाऊन पाण्यात पडल्याने एका ६० वर्षीय शेतकर्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना दि.१८ नोव्हेंबर घडली होती. दरम्यान सदर प्रकरणी पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून चारठाणा पोलीस ठाण्यात रविवारी (दि.२४) आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.
जिंतुर तालुक्यातील जांब ( बु ) येथील रामराव दत्तराव बुधवंत (वय ६०) यांचे गावालगत शेत असून दि.१८ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास ते त्यांची पत्नी नंदाबाई बुधवंत यांच्यासोबत त्यांच्या शेतातील विहीरीत पाण्याची मोटार टाकण्यासाठी गेले होते. दरम्यान मोटार विहीरीत सोडताना रामराव यांचा पाय घसरल्याने तोल जाऊन ते विहीरीत पडले. पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. मयत शेतकर्याची पत्नी नंदाबाई बुधवंत हिने दि.२४ रोजी चारठाणा पोलीस ठाण्यात खबर दिल्यानंतर सदर प्रकरणी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल सूर्यकांत केजगीर हे करीत आहेत.