Parbhani Drought | पूर्णा तालुक्यात सोयाबीनची शिवारं करपली; विहिरींनी गाठला तळ

कोरड्या दुष्काळाच्या झळा सुरू; गावागावांत भयाण वास्तव, शेतकरी चिंताग्रस्त
Purna Taluka Drought
Soybean Crop DamagePudhari
Published on: 
Updated on: 

Purna Taluka Drought Soybean Crop Damage

आनंद ढोणे

पूर्णा : पूर्णा तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात कोरड्या दुष्काळाचे भीषण संकट ओढवले आहे. मागील अडीच महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने जमिनी कोरड्या पडल्या असून शिवारात उभी असलेली सोयाबीनची पिके शेंगांमध्ये दाणे न भरताच करपून वाळून गेली आहेत. शेतीमशागत, बियाणे आणि खतांवर केलेला खर्चही भरून निघणार नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

पिके हातची गेल्याने वर्षभराचा घरखर्च, मुलांचे शिक्षण, कपडालत्ता आणि दिवाळीचा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. यंदा मोठा पाऊस न झाल्याने जमिनीत उन्हाळ्यापूर्वीच मोठ्या भेगा पडल्या आहेत. भूगर्भातील पाणीपातळी खालावल्याने विहिरी आणि बोअरवेल्सनी तळ गाठला आहे. आगामी काळात पिण्याच्या पाण्याचेही मोठे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Purna Taluka Drought
Parbhani Accident : दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू, जिंतूर तालुक्यातील घटना; डांबरीकरणाच्या कामामुळे घटना घडल्याचा आरोप

माणसांसोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. चारा-पाण्याअभावी शेतकरी दुभती जनावरे तसेच औताची जनावरेही मिळेल त्या भावात विक्रीला काढत आहेत. गावोगावी कोरड्या दुष्काळाचे भयाण वास्तव दिसत असून शेतकरी शेतातही चिंताग्रस्त अवस्थेत दिसत आहेत.

मदतीची प्रतीक्षा कायम

सरकारने कोरड्या दुष्काळाची घोषणा केली असली तरी प्रत्यक्ष उपाययोजना अद्याप सुरू झालेल्या नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. हेक्टरी मदतीची निश्चित रक्कम जाहीर करण्याऐवजी महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून बाधित पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. आर्थिक मदतीचे पॅकेज कधी जाहीर होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Purna Taluka Drought
Parbhani Crime : चारठाण्यात एकाच रात्री पाच ठिकाणी घरफोड्या

खरीप २०२५ मधील अतिवृष्टीची पीकविमा भरपाई अद्याप मिळालेली नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. चालू हंगामातील पावसाअभावी वाळून गेलेल्या पिकांच्या विमा भरपाईबाबतही अद्याप स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नसल्याची आश्वासने दिली जात असली तरी प्रत्यक्ष मदत मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

शेतमजुरांवरही संकट

शेतीची पिके वाळून गेल्याने शेतमजुरांच्या हातालाही काम उरलेले नाही. रोजगाराच्या शोधात अनेक मजूर पुणे, मुंबईसह औद्योगिक शहरांकडे स्थलांतर करीत आहेत. मात्र तेथेही अपेक्षित रोजगार उपलब्ध होत नसल्याने मजुरांसमोर उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे. रोजगार हमीची कामेही अनेक ठिकाणी सुरू झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. सुरू असलेल्या कामांचे अनुदानही रखडल्याची तक्रार आहे.

पिके पूर्णपणे हातची गेल्याने कर्जबाजारीपणा वाढत असून शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहार ठप्प होण्याची चिन्हे दिसत आहेत. गावातील बाजारपेठा, शेतशिवार आणि रोजगाराची साधने यावरही दुष्काळाचा परिणाम जाणवत आहे.

Purna Taluka Drought
Parbhani Crime : ऊसतोड मुकादमाकडून मजूर महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न

उपाययोजना तातडीने सुरू करण्याची मागणी

दिवसभर मे महिन्यासारखे कडक ऊन आणि रात्री स्वच्छ आकाश अशी स्थिती सध्या तालुक्यात अनुभवास येत आहे. त्यामुळे पुढील काळात पाणी, चारा आणि रोजगाराचे संकट अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त होत आहे. कोरड्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना सुरू करून शेतकरी आणि शेतमजुरांना आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी तालुक्यातील शेतकरी व शेतमजुरांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news