

परभणी : जिल्ह्याने पुन्हा एकदा आरोग्य क्षेत्रात आपली दमदार छाप सोडली आहे. राज्यातील सर्व जिल्हा व सामान्य रुग्णालयांच्या ऑगस्ट २०२५ महिन्याच्या रँकिंगमध्ये परभणी जिल्हा रुग्णालयाने तब्बल ७१ गुणांसह राज्यात पहिला क्रमांक पटकावला असून, ही कामगिरी संपूर्ण मराठवाड्यासाठी अभिमानास्पद ठरली आहे.
या यशामागे रुग्णालयातील शल्यचिकित्सक डॉ.नागेश लखमावार व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सारिका बडे यांच्या नेतृत्वाखालील सक्षम टीम, प्रभावी व्यवस्थापन, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची काटेकोर अंमलबजावणी, स्वच्छता व आपत्कालीन सेवांची उल्लेखनीय सुधारणा, तसेच २४x७ तत्पर असलेल्या रुग्णनिष्ठ कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे मानले जात आहे. परभणी जिल्हा रुग्णालयाने प्रमुख क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली. यात मातृ व बाल आरोग्य सेवांमध्ये सातत्यपूर्ण दर्जा, आपत्कालीन सेवांसाठी त्वरित प्रतिसाद, तंत्रज्ञानाधिष्ठित नोंदी व अहवाल व्यवस्थित वेळेत, स्वच्छता, निर्जंतुकीकरण व रुग्ण अनुकूल व्यवस्था, तपासण्यांची उपलब्धता आणि वेळेत निदान, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी यांचा समावेश आहे. या सर्व निकषांमुळे परभणीने महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांना मागे टाकत खात्रीशीरपणे अव्वल स्थान पटकावले आहे.
जिल्हा रुग्णालयांच्या श्रेणीत हिंगोली (६९ गुण) आणि सातारा (६९ गुण) यांनी संयुक्तपणे दुसरे स्थान मिळविले. तर उत्त्साहसनगर (६५) आणि बीड (६१) यांनी पहिल्या पाचमध्ये समावेश केला. परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांनी मिळविलेली कामगिरी विशेष कौतुकास्पद मानली जात आहे. परभणी जिल्ह्याने आरोग्य सेवेच्या गुणवत्तेत राज्यात आघाडी घेतली असली तरी ही गती कायम राखत आणखी उंची गाठण्याचे आव्हानही समोर आहे.
उपजिल्हा रुग्णालयांच्या श्रेणीत गडहिंग्लजने ६२ गुण मिळवून प्रथम, तर भिवंडी, कराड, जव्हार आणि डहाणू यांनी अनुक्रमे दुसरे ते पाचवे स्थान मिळवले. तसेच या महिन्याच्या रँकिंगमध्ये काही जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांची कामगिरी मात्र समाधानकारक नसल्याचे आरोग्य विभागाचे निरीक्षण आहे. जिल्हा रुग्णालयांमध्ये नंदुरबार (१३), नाशिक (१४), बुलढाणा (२८), पुणे (३१) आणि धुळे (३१) ही रुग्णालये शेवटच्या क्रमांकावर राहिली.
उपजिल्हा श्रेणीत कणकवली (१९), तुळजापूर (२७), अचलपूर (२९), कळवण (३७) आणि येवला (३८) ही रुग्णालये पिछाडीवर आहेत.