

Nilgai falls into well
चारठाणा: सेलू तालुक्यातील आरसड येथील शेतकरी गोदावरी आसाराम ढगे यांच्या शेतातील विहिरीत मंगळवारी (२५ नोव्हेंबर) सकाळी नऊच्या सुमारास एक नीलगाय पडल्याची घटना घडली. सुदैवाने वेळेवर मदत मिळाल्याने नीलगाय सुखरूप बचावली.
या परिसरात नीलगाय, हरीण आणि काळवीट यांचे कळप मोठ्या प्रमाणात फिरत असल्याने शेतकऱ्यांचे पिके सतत हानीला सामोरे जात आहेत. याचदरम्यान पाण्याच्या शोधात भटकत भटकत एक नीलगाय ढगे यांच्या गट क्रमांक ७ मधील विहिरीजवळ आली आणि चुकून विहिरीत कोसळली.
सकाळी शेतात गेलेल्या सहदेव ढगे यांनी विहिरीत नीलगाय पडलेली पाहताच तत्काळ वनविभागाला माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी ए. एच. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अंकुश जाधव घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ मदतकार्य सुरू करून नीलगायला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढले.
नंतर माहिती मिळताच चारठाणा पशुधन दवाखान्यातील डॉक्टर सोनवणे यांनी घटनास्थळी येऊन नीलगायीवर प्राथमिक उपचार केले. वेळेवर मदत मिळाल्याने नीलगाय पूर्णपणे सुरक्षित राहिली.वनरक्षक अंकुश जाधव यांच्या तत्परतेमुळे नीलगायीचे प्राण वाचले, त्यामुळे ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.