

Dharangaon Farmer river drowning
परभणी : तालुक्यातील धारणगाव येथील तरुण शेतकरी ई - पीक पाहण्यासाठी शेतात जात असताना पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. ८) पहाटे उघडकीस आली. गजानन आश्रुबा डुकरे (वय २२) असे मृत तरुण शेतक-याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गजानन डुकरे हा रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ई - पीक पाहणीसाठी शेतात जायला निघाला. नदीतून जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने गजाननाचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि नागरिकांनी जिल्हा प्रशासनास याबाबत माहिती दिली. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जीवरक्षक पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने सायंकाळी सहा वाजेपर्यंत बुडलेल्या गजानन डुकरेचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही, त्यामुळे पथक परत आले.
दरम्यान, नातेवाईक नागरिक रात्रभर नदी परिसरात गजाननचा शोध घेत होते. सोमवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास समसापूर येथील बंधाऱ्यात मृतदेह अडकल्याचे नागरिकांना दिसून आले. उपस्थितांनी तात्काळ मृतदेह बाहेर काढला.
नातेवाईक व उपस्थितांनी गजानन डुकरेचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणून याविषयी जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी मृत गजानन डुकरेच्या नातेवाईक व नागरिकांची भेट न घेतल्याने संताप व्यक्त होत होता. यावेळी मृत गजानन डुकरेच्या परिवारास तात्काळ आर्थिक मदत द्यावी आणि समसापूर येथील बंधारा तत्काळ हटविण्याची मागणी नातेनाईक व धारणगाव येथील नागरिकांनी केली आहे.