

Parbhani cotton farmers
मानवत : परभणी जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्याकडून सीसीआयने प्रती हेक्टरी 26.68 क्विंटल कापूस खरेदी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. आमदार राजेश विटेकर यांनी यासाठी मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा केला होता.
याबाबत माहिती अशी की, शेतकऱ्यांकडून सीसीआयने कापूस खरेदी करण्यासाठी प्रती हेक्टर 15 क्विंटल मर्यादा निश्चित केली होती. परंतु हेक्टरी जास्त उत्पन्न झालेल्या शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण होऊन शिल्लक राहिलेला कापूस कमी भावात व्यापाऱ्यांना विकावा लागत होता. कापूस उत्पादक शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन आ. राजेश विटेकर यांनी प्रती हेक्टर 26 क्विंटल कापूस खरेदी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्यांच्या मागणी नुसार सीसीआयने प्रती हेक्टर कापूस खरेदी मर्यादा 26.68 क्विंटल करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
कृषी विभागाने पीक कापणी प्रयोगांतील सर्वाधिक उत्पादन असलेल्या २५ % प्रयोगांची सरासरी काढून परभणी जिल्ह्यासाठी नवी मर्यादा म्हणून 15 क्विंटलचा प्रस्ताव मांडला होता. त्याप्रमाणे सीसीआयने 15 क्विंटल प्रति हेक्टर प्रमाणेच प्रस्ताव मान्य करून जिल्हावार मर्यादा निश्चित केल्या होत्या.
परभणी जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची उत्पादक क्षमता, लक्षात घेता जिल्ह्यातील शेतकरी यांच्यासाठी हे नियम बदलून 25 क्विंटल प्रति हेक्टर प्रमाणे अशी वाढीव खरेदी मर्यादा करण्यात यावी, अशी मागणी पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर यांनी केली होती.