

मानवत: तालुक्यातील नागरजवळा येथील एका शेतकऱ्याचा ऊस घेऊन साखर कारखान्याला जाणारे एक ट्रॅक्टर हेड व ट्रॉलीसह किन्होळा पाटीजवळ जायकवाडी कॅनॉलमध्ये पडल्याने झालेल्या भीषण अपघातात ट्रॅक्टर चालकाचा दबल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ता 9 सायंकाळी 5 सुमारास घडली.
महादेव नागोराव गोरे असे अपघातात मृत झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव असून तो पाथरी तालुक्यातील रेणापूर येथील रहिवाशी होता. त्याचे स्वतःचे ट्रॅक्टर असून तो नागरजवळा येथील भागवत होगे यांचा ऊस घेऊन आमदापुर येथील लक्ष्मी नृसिंह या साखर कारखान्याला जात होता. सदरील ट्रॅक्टरच्या हेडला दोन ट्रॉल्या भरून ऊस असल्याने ट्रॅक्टर जड झाल्याने किन्होळा पाठीजवळ असलेल्या कॅनॉल मध्ये कोसळल्याची माहीती आहे. झालेल्या अपघातात उसाच्या व ट्रॅक्टर च्या ओझ्याखाली दबल्याने चालकाचा मृत्यू झाला असून घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेत मदतीचा प्रयत्न केला.पोलिसांनी व इतरांनी जेसिबी ला बोलावून मदतकार्य रात्री सुरु होते. याच रस्त्यावर गेल्या आठ दिवसात उसाने भरलेले ट्रॅक्टर पलटण्याची ही तिसरी वेळ आहे.