

Chudawa Farmers Protest
पूर्णा : मागील २०२४ खरीप हंगामात अतिवृष्टीत काढणी पश्चात सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान झाले होते. त्या संदर्भात आयसीआयसी लोंबार्ड पीक विमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात आल्या होत्या. परंतू, त्या तक्रारी कंपनीने रद्द केल्यामुळे नुकसान भरपाई मिळणे दुरापास्त झाले आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी चुडावा (ता.पूर्णा) येथे आज (दि.२) सकाळी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.
शेतकऱ्यांना ७५ टक्के नुकसान भरपाई दिल्या जात असल्याची माहिती विमा कंपनी प्रतिनिधी देत आहे. त्यामुळे चुडावा येथील संतप्त शेतकऱ्यांनी संबंधित पीक विमा कंपनी व सरकारविरोधात रास्ता रोको केला.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रेम देसाई, सुधीर देसाई, तुळशीराम सुर्यवंशी, अंकुश देसाई, मारोतराव देसाई, प्रभाकर देसाई, भगवान देसाई, जानोजी देसाई, नागेश देसाई, श्रीरंग देसाई आदी शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. दरम्यान, सपोनि नरसिंग पोमनाळकर यांनी बंदोबस्त ठेवला होता. तर नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी निवेदन स्वीकारले.