

Charthana bus stand road potholes Issues
जिंतूर : तालुक्यातील चारठाणा हे स्वातंत्र्यसैनिकांचे गाव म्हणून ओळखले जात असले, तरी गावातील टी-पॉईंट ते मारुती मंदिर बसस्थानक हा सुमारे दीड किलोमीटरचा रस्ता सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे तो अक्षरशः ‘मृत्यूचा सापळा’ ठरत असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. हा रस्ता जिल्हा परिषदच्या अखत्यारीत असूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. निवडणुकीच्या काळात उमेदवारांकडून रस्ता दुरुस्तीची आश्वासने दिली जातात; मात्र निवडून आल्यानंतर या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जाते, अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीनंतरही दीड महिना उलटून गेला असतानाही रस्त्याची स्थिती ‘जैसे थे’च आहे. विशेष म्हणजे या मार्गावर दोन पूल असून तेही जीर्ण अवस्थेत असल्याने वाहतूक आणखी धोकादायक बनली आहे.
दरम्यान, प्रत्येक निवडणुकीत या रस्त्याबरोबरच गोदरी नदीवरील पुलाचा मुद्दा उपस्थित केला जातो. ‘निवडून आल्यास सर्वप्रथम रस्ता आणि पूल बांधू’ अशी आश्वासने दिली जातात; मात्र प्रत्यक्षात कामे होत नसल्याने मतदारांमध्ये नाराजी वाढत आहे.
सध्याची परिस्थिती पाहता, टी-पॉईंट ते मारुती मंदिर बसस्थानक हा रस्ता तात्काळ दुरुस्त करून संभाव्य अपघात टाळावेत, अशी मागणी ग्रामस्थ आणि वाहनधारकांकडून जोर धरत आहे.