

Charthana Gram Panchayat Driver Hunger Strike
चारठाणा : चारठाणा ग्रामपंचायत कार्यालयातील घंटागाडी चालक अन्वर शहा कटू शहा हे गेल्या तीन-चार वर्षांपासून थकीत असलेल्या मानधनाच्या मागणीसाठी शुक्रवारी ( दि. 14 ) सकाळी पत्नी कौसर बी यांच्यासह ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले. उपोषणाची दखल घेत ग्रामविकास अधिकारी, सरपंच तथा प्रशासक आणि भाजप युवा नेत्यांनी उपोषणस्थळी भेट देत चर्चा केली. यावेळी अन्वर शहा यांना 20 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.
चारठाणा ग्रामपंचायतीत अन्वर शहा हे अनेक वर्षांपासून घंटागाडी चालक म्हणून कार्यरत आहेत. मात्र, मागील तीन ते चार वर्षांपासून त्यांना मानधन मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. थकीत मानधन मिळावे, यासाठी त्यांनी ग्रामविकास अधिकारी डी. आर. कांगणे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने अखेर त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
अन्वर शहा यांनी 3 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. तरीही त्यांच्या मागणीवर तोडगा न निघाल्याने शुक्रवारी सकाळी नऊ वाजता त्यांनी पत्नी कौसर बी यांच्यासह ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.
उपोषणाची माहिती मिळताच ग्रामविकास अधिकारी डी. आर. कांगणे, सरपंच तथा प्रशासक अनिरुद्ध चव्हाण आणि भाजप युवा नेते इंद्रजीत घाटूळ यांनी उपोषणस्थळी भेट दिली. त्यांनी अन्वर शहा यांच्याशी चर्चा करून तातडीने 20 हजार रुपयांचा धनादेश दिला.
तसेच आणखी 20 हजार रुपये पंधरा दिवसांत देण्याचे आश्वासन देण्यात आले. उर्वरित थकीत रकमेचा हिशोब करून ती रक्कमही देण्याचे आश्वासन ग्रामपंचायत प्रशासनाकडून देण्यात आले. या आश्वासनानंतर अन्वर शहा आणि त्यांच्या पत्नी कौसर बी यांनी आमरण उपोषण मागे घेतले.
यावेळी सिराज इनामदार, ग्रामपंचायत कर्मचारी मुकुंदा मुंजे, भीमा कटारे, लिपिक शिवाजी देवकर, पिंटू मुजमुले, गजानन पारवे, राहुल पारवे, नाना कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.