Parbhani Accident: बस-दुचाकीच्या भीषण धडकेत आजी, आजोबांसह नातवाचा जागीच मृत्यू

पिंपरी फाट्यावर काळाचा घाला; शेवडी गावावर शोककळा
Accident
Accidentfile photo
Published on
Updated on

बोरी : परभणी-जिंतूर राज्यमार्गावरील कोकजवळील पिंपरी फाट्यावर शनिवारी (दि. ६) सायंकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. एसटी बस आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील आजी, आजोबा आणि त्यांच्या १२ वर्षीय नातवाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

जिंतूर तालुक्यातील शेवडी येथील रहिवासी भगवान बळीराम काळे (वय ६०), सुशीला भगवान काळे (वय ५०) आणि त्यांचा नातू शिवम गजानन काळे (वय १२) हे तिघे कौडगाव (ता. जिंतूर) येथे एका धोंडे जेवणाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून ते आपल्या दुचाकीने गावी परतत होते. दरम्यान, पिंपरी फाट्याजवळ जिंतूरहून परभणीकडे जाणाऱ्या एसटी बसने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकी थेट बसच्या खाली घुसली आणि तिघांचाही जागीच अंत झाला.

अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. गंभीर अवस्थेतील तिघांनाही तातडीने बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडगे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून दोन्ही वाहने ताब्यात घेतली आहेत. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.

शेवडी येथील काळे कुटुंबासाठी शनिवारचा दिवस काळाकुट्ट ठरला. एका आनंदाच्या कौटुंबिक समारंभातून हसतमुख चेहऱ्याने परतणाऱ्या या कुटुंबावर काळाने झडप घातली. एकाच वेळी घरातील तीन पिढ्यांचा (आजोबा, आजी व नातू) अंत झाल्याने शेवडी गावावर शोककळा पसरली आहे. यात अवघ्या १२ वर्षांच्या शिवमचाही मृत्यू झाल्याने पाहणाऱ्यांचेही डोळे पाणावले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news