

परभणी; पुढारी वृत्तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस केल्याच्या मंगळवारच्या घटनेचे तीव्र पडसाद बुधवारी परभणी शहरात (Parbhani News) उमटले. या संदर्भात पुकारण्यात आलेल्या बंद बंदला हिंसक वळण लागले. शहरात एका जमावाने ठिकठिकाणी मध्यवर्ती भागात वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करीत हिंसक आंदोलन केले. प्रचंड दगडफेक करत घरांचे आणि दुकानांचे नुकसान केले. येथे ठिकठिकाणी रास्ता रोको आणि चक्काजाम करत आंदोलकांनी धुडगूस घातला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एका माथेफिरूने नासधूस केली. त्याचवेळी प्रत्यक्षदर्शींनी त्याला बेदम सोप दिला होता. पोलिसांनी जमावाला बाजूला सारत त्या माथेफिरुस ताब्यात घेतले. मात्र त्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत जमाव डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ ठाण मांडून होता. यामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न व्यर्थ ठरला. रात्री अनेक अनेक ठिकाणी दगडफेक आणि लाठीचार्जच्या घटना घडल्या. या संदर्भात आंदोलकांनी बुधवारी परभणी बंदचे आवाहन केले होते. या बंददरम्यान जमावाने मोठा धुडगूस घातला.
शहराच्या मध्यवर्ती भागात शेकडो वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली. मात्र, पोलीस या प्रकारांसमोर निष्प्रभ ठरले. अद्यापपर्यंत जिल्हा प्रशासनाने कोणतीही जमावबंदी अथवा अन्य आदेश लागू केलेला नाही. सध्या जमाव मुख्य चौकांवर ठाण मांडून आहे. त्यामुळे शहरात मोठे तणावाची वातावरण निर्माण झाले आहे.