Parbhani Crime : मारहाणीची तक्रार देणाऱ्यालाच कोतवाली पोलिसांची दमदाटी

धबडगे कुटुंबीयांची पोलिस अधीक्षकांकडे धाव; सीसीटीव्ही तपासा, खोटा गुन्हा दाखल न करण्याची मागणी
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

परभणी : घरासमोर चार ते पाच अनोळखी व्यक्तींसह येऊन मारहाण केल्याचा आरोप करत, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे सादर करूनही आपल्या म्हणण्यानुसार तक्रार नोंदवून घेतली नसल्याची तक्रार रवि अशोकराव धबडगे यांनी केली. कोतवाली पोलिसांनी तक्रार वाचू न देताच स्वाक्षरी घेतली तसेच गंभीर कलमे लावण्याची मागणी केल्यावर दमदाटी केल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, आपल्याविरुद्ध खोटा व गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाल्याचे सांगत, सीसीटीव्ही फुटेजची निष्पक्ष तपासणी करूनच कारवाई करावी, अशी मागणी धबडगे यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

धबडगे यांनी सोमवारी (दि.१४) पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात घटनेची माहिती दिली. त्यानुसार, ११ सप्टेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास त्यांचा भाचा कबीर ऊर्फ पियुष सदर हा गंगाखेड रोड परिसरात पेट्रोल आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याचा किरण मोतीराम भोजणे यांच्यासोबत वाद झाला. त्यानंतर कबीरने फोन करून माहिती दिली असता त्याला भांडण न करता घरी येण्यास सांगितल्याचे धबडगे यांनी नमूद केले.

Crime News
Ahilyanagar Ganeshotsav: अहिल्यानगरीत बाप्पाचा जल्लोषात प्रवेश; ढोल-ताशांच्या गजराने शहर दुमदुमले

दुपारी सव्वाचारच्या सुमारास चार ते पाच अनोळखी व्यक्ती धबडगे यांच्या घरासमोर आल्या. त्यांनी लोखंडी गेटवर दगड व लोखंडी रॉडने मारहाण करून शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. आवाजामुळे धबडगे, त्यांची पत्नी संध्या आणि मुलगा राजरतन घराबाहेर आले. त्यावेळी संबंधित व्यक्ती काही अंतरावर गेल्यानंतर पुन्हा किरण मोतीराम भोजणे, मोतीराम भोजणे, राजश्री भोजणे व शांताबाई मोतीराम भोजणे यांच्यासह चार ते पाच अनोळखी व्यक्ती तेथे आल्याचे निवेदनात म्हटले.

या व्यक्तींच्या हातात लोखंडी रॉडला सायकलच्या चैनचे दाते वेल्डिंग केलेले हत्यार, कत्ती, दगड व बेल्ट असल्याचा दावा धबडगे यांनी केला आहे. त्यांनी शिवीगाळ करून धबडगे कुटुंबीयांना मारहाण करण्यास सुरुवात केल्याचे निवेदनात नमूद आहे. राजरतन याच्या मनगटावर व पाठीवर बेल्टने मारहाण केल्याचा आरोप आहे.

यावेळी राजश्री भोजणे हिने संध्या व राजरतन यांच्या डोळ्यांत व अंगावर चटणी फेकून यांना एकदाचे संपवून टाका, असे म्हटल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर झालेल्या दगडफेकीत धबडगे यांच्या दोन्ही हातांवर व पाठीवर दुखापत झाली, तर पत्नी व मुलाच्या डोक्याला दगड लागून ते जखमी झाल्याचे सांगितले.

राजरतन याला किरण भोजणे याने मागून पकडले आणि सोबतच्या व्यक्तींना त्याला मारण्यास सांगितल्याचा आरोप आहे. त्याचवेळी पांढरा शर्ट घातलेल्या एका अनोळखी व्यक्तीने राजरतनवर लोखंडी रॉडने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा रॉड चुकून किरण भोजणे यांच्या डोक्यात लागल्याने ते खाली पडले. त्यानंतर सर्वजण तेथून निघून गेल्याचे निवेदनात म्हटले आहे. या घटनेचे संपूर्ण चित्रीकरण घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्याची रेकॉर्डिंग पेनड्राइव्हद्वारे पोलिसांना दिल्याचे धबडगे यांनी नमूद केले आहे.

Crime News
Rashi Bhavishya Today: 'या' राशीच्या व्यक्तींना आज नवीन आर्थिक संधी मिळतील; तुमचा दिवस कसा जाईल?

घटनेनंतर उपचार घेतल्यानंतर १३ सप्टेंबर रोजी कोतवाली ठाण्यात जाऊन सीसीटीव्ही रेकॉर्डिंग दाखवून आपल्या म्हणण्यानुसार तक्रार नोंदविण्याची विनंती केली. मात्र पोलिसांनी आपले म्हणणे पूर्णपणे न ऐकता तक्रार तयार केली आणि ती वाचू न देताच स्वाक्षऱ्या घेतल्याचा आरोप केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य कलमे लावण्याची मागणी केली असता पोलिसांनी आमच्या हिशोबानेच तक्रार दाखल करावी लागते, असे सांगून दमदाटी केल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

निष्पक्ष चौकशी करा : रवी धबडगे

मोतीराम भोजणे व त्यांचे नातेवाईक कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन आपल्यासह कुटुंबीयांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्याचे धबडगे यांनी सांगितले. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज तपासावे, घटनास्थळावरील साक्षीदारांचे जबाब नोंदवावेत आणि त्यानंतरच निष्पक्षपणे कारवाई करावी, अशी मागणी केली. आपल्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करू नये तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आपली तक्रार योग्य पद्धतीने नोंदवून घेण्याचे आदेश कोतवाली पोलिसांना द्यावेत, अशी विनंती रवि धबडगे यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news