

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: बरबडी (ता. पूर्णा) येथील अंगणवाडी सेविकेने गाव शिवारातील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि.१६) दुपारी ४ वाजता उघडकीस आली. वनिता रामराव शिंदे (वय ४३) असे मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बरबडी येथील अंगणवाडी सेविकेने सोमवारी दुपारी ४ वाजता शेतकरी बालाजी कुंडलिक शिंदे यांच्या शेतीतील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेची तक्रार अर्जुन रामराव शिंदे यांनी पूर्णा पोलिसांत दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिंदे, अमर चाऊस यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. या प्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास अमर चाऊस करत आहेत.
दरम्यान, बरबडी येथील राणी हनुमान शिंदे (वय २२) हिने हुंड्यासाठी सासरच्या जाचाला कंटाळून गावाशेजारील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली होती. मागील बारा दिवसांत दोन महिलांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.