

वाशिम; पुढारी वृत्तसेवा : परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्या समोरील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करणाऱ्या व्यक्तीवर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करुन कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी वाशिम येथील सर्व समाजबांधवाच्या वतीने आज (दि. 12) जिल्हाधिकारी वाशिम यांच्याकडे करण्यात आली.
याबाबत शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या घटनेमागे कुठल्या लोकांचा वरदहस्त आहे, हे शोधून काढावे. तसेच घटनेच्या निषेधार्थ केलेल्या आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये. आंदोलकांची सुरु असलेली धरपकड बंद करण्यात यावी. अन्यथा संविधान प्रेमी विविध संघटनांच्या वतीने व बौध्द समाजाच्या वतीने महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर बौद्ध समाजचे लोकनेते डॉ. सिद्धार्थ देवळे, मोहन गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या मेघताई डोंगरे, दौलत हिवराळे, सुमित कांबळे, अजय ढवळे, रवि पट्टेबहादूर, अनंता तायडे, सोनाजी इंगळे, पवन राऊत, नागसेन पट्टेबहादूर, सागर इंगोले, राम जाधव, शाम खिल्लारे, सौरभ गायकवाड, राम खिल्लारे, प्रतिक कांबळे, यांच्या स्वाक्षरी आहेत.