

Aherwadi Vadgaon Road Work Poor Quality
पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: माटेगाव फाटा ते आहेरवाडी-वडगाव या रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याच्या कारणावरून ग्रामस्थांनी बंद पाडले होते. त्यानंतर आज (दि.३०) पूर्णा सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उप अभियंता संजयकुमार देशपांडे यांनी रस्त्याची पाहणी केली. यावेळी अंदाजपत्रकाप्रमाणे काम होत नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे संबंधित कंत्राटदार नियमाप्रमाणे काम करीत नाही, तोपर्यंत काम करु नये, असे आदेश देण्यात आले.
या रस्त्याचे काम उत्कृष्टरीत्या दर्जेदार व्हावे, यासाठी छगनराव मोरे, सोपान मोरे, सुभाष मोरे, सुभाष खंदारे, बबन खंदारे, संभाजी मोरे, रामचंद्र मोरे, राम पिंपरणे, मनोहर खंदारे, दत्तराव भालेराव, डिंगाबर खंदारे, राम भालेराव आदीसह सुरवाडी, आहेरवाडी, वडगाव येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेतला होता.
पूर्णा तालूक्यात काही ठिकाणी प्रधानमंत्री ग्राम सडक व सार्वजनिक बांधकाम खात्या अंतर्गत रस्ता बांधणीची कामे चालू आहेत. ही रस्ता कामे निकृष्ट दर्जाची केली जात आहेत. चांगले काम केल्याचे दाखवून एमबी रेकॉर्ड तयार करुन बिले हडप केली जात आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.