

Tadkalas Kalgaon murder accused police custody
ताडकळस: शेतातील रस्त्याच्या वादातून ताडकळस जवळील कळगाव शिवारातील आखाड्यावर विलास शिंदे यांचा २९ ऑगस्टरोजी खून झाला होता. या प्रकरणी अटक केलेले संशयित आरोपी कुबेर दादाराव माने (रा. कळगाव), कैलास उर्फ बाळू साहेबराव होनमणे (रा. ताडकळस) या दोघांना पूर्णा न्यायालयाने बुधवार (दि. ३) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मृत विलास उत्तमराव शिंदे (वय 50, रा. कळगाव शिवार आखाडा, गट क्र. 169) यांच्यावर कुबेर दादाराव माने (रा. कळगाव, ता. पूर्णा) व कैलास उर्फ बाळु साहेबराव होनमणे (रा. ताडकळस, ता. पूर्णा) या दोघांनी संगनमताने हल्ला केला होता. शेतातून रस्ता का देत नाहीस या कारणावरून आरोपींनी चाकूने वार केले. यात विलास शिंदे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता.
या हल्ल्यात त्यांची पत्नी शिंदुबाई विलास शिंदे आणि सुन जयश्री चंद्रकांत शिंदे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर परभणी येथे उपचार सुरू आहेत. मृताचा मुलगा मात्र थोडक्यात बचावला होता.