

Kalgav Shivara Farmer murder case
ताडकळस : परभणी जिल्ह्यातील ताडकळस जवळील कळगाव शिवारात रस्ता देण्याच्या वादातून एका शेतकऱ्याचा खून झाला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 29) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.
मृत विलास उत्तमराव शिंदे (वय 50, रा. कळगाव शिवार आखाडा, गट क्र. 169) यांच्यावर कुबेर दादाराव माने (रा. कळगाव, ता. पूर्णा) व कैलास उर्फ बाळु साहेबराव होनमणे (रा. ताडकळस, ता. पूर्णा) या दोघांनी संगनमताने हल्ला केला. शेतातून रस्ता का देत नाहीस या कारणावरून आरोपींनी चाकूने वार केले. यात विलास शिंदे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या हल्ल्यात त्यांची पत्नी शिंदुबाई विलास शिंदे आणि सुन जयश्री चंद्रकांत शिंदे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर परभणी येथे उपचार सुरू आहेत. मृताचा मुलगा मात्र थोडक्यात बचावला.
घटनेची माहिती मिळताच ताडकळस पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे व सहाय्यक उपनिरीक्षक गणेश लोंढे यांच्या मदतीने दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
मृताचा मुलगा चंद्रकांत विलास शिंदे (वय 33) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ताडकळस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे करीत आहेत.