Notice for land acquisition for Sambhajinagar-Parbhani doubling
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी रेल्वेस्थानकापासून जवळपास तीस पेक्षा अधिक गावांतील रेल्वे रुळाजवळच्या हजारो नागरिकांना भूसंपदनासाठी केंद्र शासनाने राजपत्र प्रसिद्ध केले आहे. या अनुषंगाने नोटीस बजावण्यात येत असल्याने नागरिकांचे धाबे दणाणले आहेत.
अंकाई ते छत्रपती संभाजीनगर आणि पुढे परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाला वेग आला आहे. दुहेरीकरणासाठी केंद्र शासनाने जमीन भूसंपादनाच्या अनुषंगाने राजपत्र प्रसिद्ध केले आहे. यामध्ये छत्रपती संभानगर रेल्वेस्टेशनपासून पुढे मुकुंदवाडी, शहानुरवाडी, सातारा, चिकलठाणा, मुर्तुजापूर, लाडगाव, कुंभेफळ, शेंद्रा जहांगीर, करमाड, मुस्तफाबाद, शेकटा, वरुडकाझी, हसनाबादवाडी, फत्तेपूर, करंजगाव, गाढेजळगाव, हसनाबादवाडी यासह विविध गावांचा सामावेश आहे.
या सर्व गावांतील रेल्वे मार्गालगतचे भूसंपादन करण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये हजारो नागरिकांची घरे, प्लॉट, फ्लॅट आणि शेतजमिनी बाधित होणार आहेत. भूसंपादनाबाबत काही अक्षेप असल्यास संबंधित मालकांनी जिल्हा भूसंपादन अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करण्याचे सांगण्यात आले.