

Purna Depot wagon inspection
पूर्णा : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने २०२५-२६ या आर्थिक वर्षात पूर्णा रेल्वे डेपोवरील वॅगन तपासण्यांची संख्या वाढवत मालवाहतूक कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा साधली आहे. सुधारित कार्यपद्धती आणि प्रभावी देखभाल यामुळे हा सकारात्मक बदल दिसून आला आहे.
माहितीनुसार, २०२४-२५ या वर्षात पूर्णा डिपोवर २४८ वॅगन तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात वाढ होऊन २०२५-२६ मध्ये ही संख्या २८२ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे प्रीमियम वॅगन तपासण्यांमध्ये मोठी वाढ नोंदवली गेली असून, मागील वर्षीच्या ५५ तपासण्यांच्या तुलनेत यावर्षी तब्बल १५८ तपासण्या करण्यात आल्या.
प्रीमियम तपासणी ही जलद आणि अधिक सखोल प्रक्रिया असल्याने वॅगन कमी वेळात सेवेसाठी तयार होतात. यामुळे सुरक्षा आणि गुणवत्ता मानकेही अधिक मजबूत राहतात. परिणामी मालगाड्यांची उपलब्धता वाढून त्यांचा टर्नअराउंड वेळ कमी झाला आहे, ज्याचा थेट फायदा मालवाहतूक व्यवस्थेला होत आहे.
वॅगन जलद उपलब्ध झाल्याने परिसरातील उद्योग आणि ग्राहकांना मालवाहतूक अधिक कार्यक्षम व विश्वासार्ह पद्धतीने करता येत आहे. यामुळे स्थानिक लॉजिस्टिक्स साखळी अधिक सुलभ होत असून, प्रादेशिक आर्थिक विकासालाही चालना मिळत आहे.
नांदेड रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांनी सांगितले की, विभाग मालवाहतूक सेवा अधिक सक्षम करण्यासाठी, कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. आगामी काळात पायाभूत सुविधा मजबूत करून आणि नवोन्मेषी उपाययोजना राबवून मालवाहतूक क्षमतेत आणखी वाढ करण्यावर भर दिला जाणार आहे.