

Mini-Travels Car in Horrific Accident; 4 Killed, 9 Injured
चारठाणा, पुढारी वृत्तसेवा नांदेड-संभाजीनगर राज्य महामार्गावरील गणेशपूरजवळ रविवारी (दि. २२) दुपारी दीड वाजेच्या सुमारास मिनी ट्रॅव्हल्स आणि कारचा भीषण अपघात होऊन तीन जागीच ठार झाले असून एक जणाचा उपचारासाठी संभाजीनगरकडे नेताना रस्त्यातच मृत्यू झाला. तर दहाजण गंभीर जखमी झाले. दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात या दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
कार मिळालेल्या माहितीनुसार, (क्र.एमएच १२, जीएफ ६२५९) व मिनी ट्रॅव्हल्स (क्र. एमएच- २०, डीडी- ७६६६) ही वाहने एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येत होती. अचानक समोर आलेल्या दुचाकीला वाचविताना दोन्ही वाहन चालकांचा ताबा सुटला आणि दोन्ही वाहनांची भीषण धडक झाली. या अपघातात कारमधील सय्यद आवेद अली सय्यद महबूब अली (३८), सय्यद सुमय्या सय्यद आबेद अली (३५) व मरियम सय्यद आबेद अली (९, सर्व रा. वसमत) यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात कामरधील १. सय्यद इस्माईल सय्यद महेबूब अली, २. सय्यद फरवा सय्यद आबेद अली (४) व ३. सय्यद उफद सय्यद आबेद अली (७) हे जखमी झाले असून त्यांना तात्काळ जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील सय्यद ईस्माईल सय्यद मेहमूद अली यांचा पुढील उपचारासाठी संभाजीनगरकडे नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाला. कारमधील सर्व सहाजण एकाच कुटुंबातील असून असून ते वसमतहून ईद निमित्त आपल्या नातेवाईकांकडे जात होते.
दरम्यान, मिनी ट्रॅव्हल्समध्ये एकूण १३ प्रवासी होते. त्यापैकी १. अशफाक कुरेशी (६०), २. अक्रम खान (६१), ३. फैमुदा अक्रम खान (५५), ४. मसीउल्ला बेग (६०), ५. शाहिदा बेगम (५५), ६. अबरार कुरेशी (३५) व ७. समीउल्ला खान (सर्व रा. संभाजीनगर) हे जखमी झाले आहेत. या सर्वांना जालना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिनी ट्रॅव्हल्समधील प्रवासी देखील रमजान ईद निमित्त प्रवास करत होते.
अपघाताची माहिती मिळताच चारठाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मुंजाजी दळवे, पोलिस उपनिरीक्षक बी.व्ही. झुंजुर्डे, जमादार उद्धव माने, हरी गायकवाड, गजानन झोरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच महामार्गचे उपनिरीक्षक नेवल, बाळासाहेब गिराम, भागवत घोडके, मनोहर हाके, सूर्यकांत हाके, महेश केदारी यांनीही मदतकार्य केले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.
या अपघातामुळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलीस अधिक तपास करीत आहेत. ईदच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
दुचाकीला वाचविताना दोन्ही वाहन चालकांचा ताबा सुटला आणि दोन्ही वाहनांची भीषण धडक झाली. या अपघातात कारमध्ये असलेले वसमत येथील सय्यद यांच्या एकाच कुटुंबातील सय्यद आबेद अली सय्यद महबूब अली (३८), सय्यद सुमय्या सय्यद आबेद अली (३५) व मरियम सय्यद आबेद अली (९) व सय्यद ईस्माईल सय्यद मेहबूब यांचा जागीच मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील पती, पत्नी व लहान मुलगी व अन्य एकजन अशा चौघांवर काळाचा घाला पडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.