

Gangakhed Vadgaon Railway track
गंगाखेड : गंगाखेड तालुक्यातील वडगांव रेल्वे स्थानकाजवळ 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजता झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकखालील भराव वाहून गेला. परिणामी या मार्गावरील गंगाखेड–परळी–लातूर रोड रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अचानक आलेल्या या संकटामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
पावसाच्या सतत कोसळणाऱ्या संततधारेमुळे भराव वाहून गेल्याने रेल्वेची धावपळ थांबली. अनेक प्रवाशांना प्रवास बीचमध्येच थांबवावा लागला. काहींनी बस वा इतर वाहनांनी गावी पोहचण्याचा मार्ग निवडला, मात्र लांब पल्ल्याचे प्रवासी स्थानकांवर अडकून पडल्याने त्यांना मोठा त्रास झाला.
रेल्वे यंत्रणेने रात्रीपासून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले असून 28 सप्टेंबर रोजी दुपारी उशिरापर्यंत काम सुरूच होते. तोपर्यंत रेल्वे प्रशासनाने काही गाड्या रद्द करण्याचा, तर काहींचे मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला.
17648 पूर्णा–हैदराबाद (29 सप्टेंबर, गंगाखेड–परळी मार्गे)
अंशतः रद्द गाड्या
17655 परळी–अकोला – परभणी स्थानकापासून धावेल
77615 परळी–आदिलाबाद – पूर्णा स्थानकापासून धावेल
77614 अकोला–परळी – वसमतपर्यंत धावेल
57654 आदिलाबाद–परळी – परभणीपर्यंत धावेल
16594 नांदेड–बैंगलोर – नांदेडपासून धावेल
मार्ग बदललेल्या गाड्या (28 सप्टेंबर)
17613 पनवेल–नांदेड – परभणी, दौड मार्गे
17253 गुंटूर–औरंगाबाद – परभणी, निजामाबाद मार्गे
11405 अमरावती–पुणे – परभणी, दौड मार्गे
17614 नांदेड–पनवेल – परभणी, दौड मार्गे
07601 जालना–तिरुपती – परभणी, निजामाबाद मार्गे
17205 शिर्डी–काकीनाडा – परभणी, निजामाबाद मार्गे
नांदेड रेल्वे विभागाने कळविल्यानुसार, दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत ही तात्पुरती व्यवस्था लागू राहणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या अडचणी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले असले तरी अचानक वेळापत्रक आणि मार्ग बदलल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ होत असल्याचे चित्र दिसून आले.