

परभणी : जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने कोरडवाहू भागातील खरीप पिके मोठ्या प्रमाणात वाया गेली आहेत. शेतकरी गंभीर संकटात असताना सत्ताधारी पक्षाचे आमदार केवळ दौरे करून पाहणी करत आहेत. त्यामुळे दौरे आणि नाटकबाजी बंद करून मराठवाड्यात तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करावी, असे आवाहन शिवसेना (उबाठा) चे माजी विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी केले.
रखडलेल्या मराठवाड्याच्या विकासाचा जाब विचारण्यासाठी शिवसेना (उबाठा) च्या वतीने 'मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा' या घोषवाक्याखाली १ ते १७सप्टेंबरदरम्यान आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून रविवारी (दि.१३) शिवसेना आ. डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
यावेळी आ. अंबादास दानवे बोलत होते. पुढे आ. दानवे म्हणाले, राज्य सरकारने शेतकऱ्यांना आठ तास वीज देण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात दोन तासांपेक्षा अधिक वीज मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्याचा विकास अनुशेष भरून काढण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाच्या बैठका घेण्यात आल्या.
या बैठकांमध्ये मराठवाड्यासाठी अनेक विकासकामांच्या घोषणा करण्यात आल्या; मात्र घोषणांना अनेक वर्षे उलटूनही परभणी जिल्ह्यातील अनेक कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. काही विकासकामे कागदावरच असून काही कामे अत्यंत संथगतीने सुरू आहेत. त्यामुळे सरकारने केलेल्या विकासाच्या घोषणांचा प्रत्यक्ष लाभ जनतेला कधी मिळणार? असा सवाल आ. दानवे यांनी उपस्थित केला. 'मराठवाड्याचा विकास तुमच्याने शक्य नाही,' अशी टीकाही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.
दरम्यान, आ. अंबादास दानवे यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारच्या कारभारावर टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कारभारावरही संताप व्यक्त केला.
या आंदोलनावेळी आ. डॉ. राहुल पाटील, महानगर प्रमुख डॉ. विवेक नावंदर, माजी आ. मीराताई रेंगे, कल्याणराव रेंगे, जिल्हाप्रमुख विष्णु मुरकटे, रवींद्र धर्मे, महिला जिल्हाप्रमुख अंबिका डहाळे, महापौर सय्यद इकबाल, अरविंद देशमुख, दिनेश बोबडे, सभागृह नेते माजुलाला, बाळासाहेब राखे, गटनेते दिलीप ठाकुर, शिवलिंग बोधने, नंदू आवचार, रवींद्र पतंगे, प्रभू जैस्वाल, बाळराजे तळेकर, विशू डहाळे, राम खराबे पाटील, राजेश रणखांबे, स्वप्निल भारती, गुणाजी आवकाळे, संजय गाडगे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्याची अद्याप एकही नोंद नसल्याचा आरोप करत, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. गणपती विसर्जनानंतर मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्याशी चर्चा करण्यात येणार असून, शेतक-यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आ. दानवे यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक समाजाचा केवळ निवडणूकीसाठी वापर
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची सरकारने गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे, असे आ. दानवे यांनी सांगितले. मराठा समाजाचा केवळ निवडणुकीसाठी वापर करून नंतर समाजाला वाऱ्यावर सोडण्याची भूमिका सरकार घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. अशीच भूमिका भाजपने धनगर समाजाबाबत घेतल्याचेही ते म्हणाले.