Youth initiative animal welfare : महातपुरीत उच्चशिक्षित तरुणातर्फे स्वखर्चातून गोशाळा

रस्त्यावरील निराधार गोधनाला मिळाला हक्काचा आसरा; नागरिकांच्या समस्यांवर दिलासा
Youth initiative animal welfare
महातपुरीत उच्चशिक्षित तरुणातर्फे स्वखर्चातून गोशाळाpudhari photo
Published on
Updated on

गंगाखेड : तालुक्यातील महातपुरी गावात सामाजिक जाणिवेचा आणि सेवाभावाचा एक प्रेरणादायी अध्याय लिहिला गेला. प्रा.डॉ.नामदेव वैजेनाथ कचरे या उच्चशिक्षित तरुणाने स्वतःच्या खर्चातून तब्बल तीन एकर जागेत जय अंबिका गौशाळा उभारून रस्त्यावर भटकणाऱ्या निराधार गोधनाला सुरक्षित आश्रय दिला आहे. या उपक्रमामुळे परिसरात निर्माण झालेली गंभीर समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊन ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गंगाखेड-सोनपेठ मार्गावरील महातपुरी ग्रामपंचायत हद्दीत अनेक वर्षांपासून मोकाट गायींचा प्रश्न गंभीर बनलेला होता. ग्रामदैवत अंबिका देवीच्या नावाने भाविकांनी सोडलेल्या गायी भटकंती करत असल्याने वाहतुकीला अडथळे, अपघाताचा धोका, तसेच शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठे नुकसान होत होते. शाळकरी मुले, वाहनचालक आणि ग्रामस्थ यांना दररोज या समस्येला सामोरे जावे लागत होते. मात्र जय अंबिका गौशाळा सुरू झाल्यानंतर या समस्येवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळाले असून गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Youth initiative animal welfare
Maharashtra Unseasonal Rain Crop Damage: अवकाळी पाऊस-गारपिटीने पुणे जिल्हा हादरला; पिकांचे प्रचंड नुकसान

ग्रामदैवत आई अंबाबाईच्या प्रेरणेने आणि आई-वडिलांच्या संस्कारातून प्रा.डॉ.कचरे यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. कोणतीही शासकीय मदत न घेता, पूर्णतः वैयक्तिक खर्चातून उभारलेली ही गौशाळा आज सेवाभावाचे जिवंत उदाहरण ठरली आहे. सध्या या ठिकाणी सुमारे 70 ते 80 गायी व वासरांचा सांभाळ केला जात आहे. गौशाळेत जनावरांच्या आहार, पाणी आणि आरोग्य व्यवस्थेवर विशेष लक्ष दिले जात आहे.

आतापर्यंत अँटी रेबीज लसीकरण पूर्ण करण्यात आले असून पुढील टप्प्यात लंपी व इतर आजारांवरील लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच दर आठवड्याला कॅल्शियम डोस देऊन जनावरांचे आरोग्य टिकवले जात आहे. उन्हाळ्यातील वाढते तापमान आणि आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जनावरांसाठी पक्क्या निवाऱ्याची अत्यंत गरज निर्माण झाली आहे. सध्या तात्पुरत्या व्यवस्थेवर काम सुरू असले तरी किमान दोन मजबूत शेड, चारा साठवणूक व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची शाश्वत सोय उभारण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी समाजातून आर्थिक सहकार्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Youth initiative animal welfare
Maharashtra Banana Farmers Crisis: केळी उत्पादक शेतकरी संकटात; दोन रुपये किलो भावाने विक्री

या उपक्रमात कुटुंबीयांचा भक्कम आधार लाभला असून आई-वडील, मोठे बंधू आणि पुतणे यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच गावातील तरुणांनीही पुढे येऊन प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केल्याने हा प्रकल्प यशस्वीपणे उभा राहिला आहे. या उपक्रमामुळे महातपुरी परिसरात सामाजिक जाणीवेचा नवा आदर्श निर्माण झाला असून सेवाभावातून समस्या समाधान याचे उत्तम उदाहरण समोर आले आहे.

पक्का निवारा, चारा व पाण्याची व्यवस्था

आई अंबाबाईची कृपा, आई-वडिलांचे संस्कार आणि समाजसेवेची प्रेरणा यामुळे मला ही सेवा करण्याची संधी मिळाली. रस्त्यावर भटकणाऱ्या गायींना हक्काचा आसरा मिळावा आणि गावकऱ्यांची अडचण दूर व्हावी, हा या गौशाळेचा उद्देश आहे. वाढत्या जनावरांच्या संख्येमुळे पक्का निवारा, चारा व पाण्याची व्यवस्था यासाठी समाजाच्या सहकार्याची गरज आहे, असे प्रा.डॉ.नामदेव कचरे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news