

Parbhani Purna Taluka MahaDBT Server Down
पूर्णा : खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकरी अनुदानावर बियाणे मिळविण्यासाठी सीएसी केंद्रावर नोंदणी करु लागले आहेत. मात्र, आपले सरकार महाडिबीटी वेबसाईट मागील काही दिवसांपासून बंद झाली आहे. त्यामुळे ऐन पेरणीच्या दिवसांत शेतकरी अडचणीत आले आहेत.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन कृषी विभाग पीक प्रात्यक्षिकमधून १०० टक्के तर उर्वरित ५० टक्के अनुदानावर सोयाबीन, तूर, मूग, उडीद बियाणांचा पुरवठा केला जातो. परंतु, साईट बंद असल्याने नोंदणी होत नाही. अनुदानावर बियाणे मिळावेत, यासाठी शेतकरी जवळील महा ई सेवा सीएसी केंद्रावर जात आहेत. तिथे नोंदणी करताना ओटीपी येतो. तो प्रविष्ट करुन २३ रुपये नोंदणी शुल्क खात्यातून कपात होते. मात्र, पुढील प्रक्रियेवर गेल्यावर सेशन ईरर येऊन नोंदणी पूर्ण होत नाही. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.
पूर्णा तालुक्यात अनेक कोरडवाहू शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ते अनुदानावर बियाणे मिळाल्यावर खरीप करता येईल? या आशेवर असताना बियाणे नोंदणीची वेबसाईट चालत नाही. त्यामुळे राष्ट्रीय अन्न सुरक्षा बियाणे योजना फसवी तर नाही ना? असा प्रश्न शेतकरी करु लागले आहेत. बियाणे नोंदणीसाठी ३१ मे शेवटची तारीख होती. त्यानंतर कृषी विभागाने मुदतवाढ देत २ जून शेवटची तारीख दिली.
परंतु, साईट बंद असल्यामुळे मुदतवाढीचा उपयोग शेतकऱ्यांना होत नाही. असंख्य शेतकरी या योजनेपासून वंचित राहू शकतात. साईट चालू नसल्यामुळे आँनलाईन नोंदणी होत नाही. त्यामुळे शासनाने कृषी खात्याला आफलाईन नोंदणी करुन घेण्याचे आदेश द्यावेत. व त्यासाठी १० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.