

चारठाणा : 'मिनी मंत्रालय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट, गण, अध्यक्ष आणि सभापती पदांच्या आरक्षणाची सोडत जाहीर होताच निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. इच्छुकांनी आपापल्या मतदारसंघांत 'चाचपणी' सुरू केली असून, समाज माध्यमांवर आपली उमेदवारी निश्चित झाल्याचे मजकूरही प्रसिद्ध होत आहेत.
जिल्हा परिषद अध्यक्षपद अनुसूचित जाती (SC) तर पंचायत समिती सभापतीपद सर्वसाधारण गटासाठी सुटले आहे. चारठाणा जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला असून, पंचायत समिती गण सर्वसाधारण राहिला आहे. यामुळे गट व गणांमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. 'मी पुन्हा येईन' चा नारा देत माजी सदस्यांनीही तयारी सुरू केली आहे.
आरक्षण जाहीर झाल्यापासून अनेक इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. उमेदवारी मिळवण्यासाठी आपापल्या पक्षांकडे जोरदार मागणी केली जात आहे. मात्र, उमेदवारांचे भवितव्य पक्षश्रेष्ठींच्या निर्णयावर अवलंबून आहे; पक्ष ज्याला तिकीट देईल, तोच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, यात शंका नाही.
अनेक राजकीय पुढाऱ्यांनी पक्षांतर केल्यामुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे काही पुढाऱ्यांना नवीन गटात राजकीय नशीब आजमावे लागणार आहे. ग्रामीण भागातील मतदार मात्र अतिशय बारकाईने राजकीय अभ्यास करत असल्याने, कोणाला राजकीय 'दगा फटका' बसणार याकडे लक्ष लागले आहे.
काही पुरुष उमेदवारांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली होती, परंतु त्यांची जागा आरक्षित झाली नाही किंवा तिथे महिलांसाठी जागा आरक्षित झाल्यामुळे अशा उमेदवारांचा हिरमोड झाल्याचे चित्र आहे.
भाजप: सत्ताधारी गटाकडून सोनाली इंद्रजीत घाटूळ, सरपंच अनिरुद्ध चव्हाण, माजी सभापती मीनाताई राऊत आणि भावनाताई बोर्डीकर यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, एकनिष्ठ असलेले इंद्रजीत घाटूळ यांच्या पत्नी सोनाली इंद्रजीत घाटूळ यांची उमेदवारी यावेळी निश्चित होईल, अशी चर्चा ग्रामीण भागात आहे.
राष्ट्रवादी (अजितदादा गट): कविता सचिन राऊत, सरुबाई शंकर जाधव यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. माजी आमदार विजयरावजी भांबळे ऐनवेळी कोणता तुल्यबळ उमेदवार उभा करतात, याकडे लक्ष आहे.
भाजप: तहसीन देशमुख, वाजिद कुरेशी हे इच्छुक आहेत.
राष्ट्रवादी (भांबळे गट): सय्यद रहमत अली, माजी पंचायत समिती सदस्य सलीमुद्दीन काझी, जलील इनामदार, शेख सुलेमान, निसार देशमुख हे इच्छुक आहेत. मात्र, विजयरावजी भांबळे सय्यद रहमत अली किंवा सलीमउद्दीन काझी या दोघांपैकी एका नावावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे.
या तालुक्यात खरी लढत भाजपचे माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर (आणि पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर) आणि अजितदादा गटाचे माजी आमदार विजयरावजी भांबळे यांच्या नेतृत्वाखालील दोन पक्षांमध्ये होणार आहे. या अटीतटीच्या लढतीत कोण बाजी मारणार, याकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
गेल्या सात वर्षांपासून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकडे भावी उमेदवारांची कडवी नजर होती आणि अखेर निवडणूक होत असल्याने 'गळ्यात बाशिंग बांधलेले' सदस्य आता गट व गणांत चकरा मारू लागले आहेत. मात्र, जनता जनार्दन कोणत्या पक्षाला कौल देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.