

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: पूर्णा तालुक्यातील काही भागात गुरूवारी (दि. ३) सायंकाळी वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. यात माहेर येथील शेतकरी दत्तराव माणिकराव पौळ यांचा मोठा बैल वीज कोसळळ्याने ठार झाला. त्यामुळे त्यांचे ४० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. तर चुडावा सर्कलमील तरंगल शिवारात काढणीला आलेले रब्बी ज्वारीचे पीक आडवे झाल्याने मोठे नुकसान झाले. (Parbhani Rain News)
काही ठिकाणी शिजवून वाळणीला घातलेली हळद भिजून मोठे नुकसान झाले. अचानक आलेल्या वळीवाच्या पावसाने शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. शेतात बांधलेल्या गुराढोऱ्यांना पावसाने झोडपून काढले. काही ठिकाणी कृषी पंपाच्या सोलार प्लेट तुटून पडल्या. कापून टाकलेले रब्बी ज्वारीचे कडबे भिजून गेले. आंबा फळांची पडझड झाली. विशेष म्हणजे वाळणीला टाकलेली हळद भिजू नये, यासाठी ताडपत्री टाकण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली होती. (Parbhani Rain News)
अवकाळी पावसाचा दगडवाडी, धानोरा मोत्या, गोविंदपूर शिवारात देखील मोठा फटका बसला. त्याच बरोबर फळबाग, भाजीपाला, सोलार पॅनलचे मोठे नुकसान झाले. यात धानोरा मोत्या येथील शेतकरी नितीन मुंजाजी मोहिते यांचा एक बैल, गोविंदपूर येथे अंकुश गणपत देसाई यांची एक वगार म्हैस वीज पडून दगावली. दगडवाडी येथील शेतकरी लक्षण परसराम वाघमारे यांचा एक बैल विजेचा धक्का लागून मृत्यू पावला.
अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी, महसूल अधिकारी तर मृत पशूधनाचे शवविच्छेदन पशूधन विकास अधिकारी यांच्याकडून केले जात आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त संबंधित शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करण्याची मागणी तहसिल कार्यालयाकडे केली आहे.