

परभणी : तालुक्यातील सुरपिंपरी येथील एक 13 वर्षीय मुलगा घराबाहेर आला असता घरासमोरील रस्त्यावर दुरूस्तीच्या कामासाठी टाकण्यात आलेल्या विजेच्या तारेचा त्याला स्पर्श झाला. यात जोराचा शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.2) सकाळी 8.30 वाजेताच्या सुमारास घडली. ओंकार सुनील गायकवाड (वय 13) असे शॉक लागून मयत झालेल्या मुलाचे नाव आहे.
ओंकार हा बुधवारी सकाळी तोंड धुण्यासाठी घराबाहेर गेला होता. घरासमोर विज केबलचे काम सुरू असल्याने रस्त्यावर ते ठेवलेले होते. या केबलचा शॉक लागल्याने ओमकार गायकवाड याचा जागीच मृत्यू झाला. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याची तक्रार नातेवाईकांकडून करण्यात आली आहे. तालुक्यातील सूरपिंपरी येथे विद्युत केबलचे काम सुरू असल्याने ते गावात अनेक ठिकाणी रस्त्यावर पसरण्यात आले होते. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान ओंकार हा झोपेतून उठल्यानंतर दात घासण्यासाठी घराबाहेर पडला. या मुलाच्या घरासमोरील दारातही विज केबल पसरलेली होते. पण त्या तारेकडे त्याचे लक्ष गेले नसल्याने तो तिकडे जात असताना विजतारेला स्पर्श झाला. ओंकारला जबर शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाईकांनी धावाधाव करत त्याला परभणी येथील शासकीय रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक जायभाये व कर्मचार्यांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला.