Parbhani Accident | परळी नाक्यावरील भीषण अपघातात गंगाखेड नगरपरिषदेचे दोन कर्मचारी जागीच ठार

Parbhani Accident
अपघातात ठार झालेले नगरपरिषद कर्मचारी शेख मुनवर शेख व संतोष साळवे
Published on
Updated on

गंगाखेड : शहरातील परळी नाका परिसरातील महाराणा प्रताप चौक येथे गुरुवारी दि. १६ सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात गंगाखेड नगरपरिषदेचे दोन कर्मचारी जागीच ठार झाले. मोटारसायकल आणि ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत हा दुर्दैवी अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी शेख मुनवर शेख छोटूमिया (वय ४५) व नगरपरिषदेतील सेवक संतोष प्रल्हादराव साळवे (वय ५०) हे एमएच-२२-ए एक्स-०५७४ क्रमांकाच्या मोटारसायकलवरून परळी नाका येथील एका हॉटेलमध्ये चहा घेतल्यानंतर निघाले होते.

त्याचवेळी परभणीकडे जाणारा एमएच-३८-एक्स-९९७७ क्रमांकाचा ट्रक आणि त्यांच्या मोटारसायकलीची समोरासमोर जोरदार धडक झाली.धडकेनंतर दोघेही ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, एका मृताच्या पोटावरून ट्रक गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

काही क्षणांतच घडलेल्या या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच गंगाखेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर दोन्ही मृतदेह गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले. शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू असून, गंगाखेड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. या दुर्दैवी घटनेमुळे नगरपरिषद कर्मचारी व शहरात शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news