

Jewellery worth 1.5 lakh rupees recovered in a house burglary case
परभणी, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात घरफोडीच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी विशेष मोहीम हाती घेतली असताना स्थानिक गुन्हे शाखेने पूर्णा येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत मोठी कामगिरी केली. गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी एका २१ वर्षीय तरुणासह १७ वर्षीय विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून घरफोडीतील तब्बल १ लाख ४७ हजार ७०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. या प्रकरणातील अन्य दोन साथीदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडणाऱ्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करून ते उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक कुमावत यांच्या आदेशाने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अपर पोलीस अधीक्षक चिखले आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते.
दरम्यान, ४ नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. पूर्णा शहरातील उड्डाणपुलाजवळील मोकळ्या जागेत एका पालाजवळ दोन संशयित इसम थांबले असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पथकाने परिसरात सापळा रचून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयितांकडे पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता पूर्णा ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्यात त्यांचा सहभाग असल्याचे समोर आले.
आरोपींनी अन्य साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यातील सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत केले. या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या कारवाईत चरण किसना ऊर्फ बशा शिंदे ऊर्फ पवार (वय २१, रा. आदिलाबाद, तेलंगणा) याला ताब्यात घेण्यात आले.
त्याच्यासोबत एका १७ वर्षीय विधी संघर्षित बालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या गुन्ह्यात सहभागी असल्याचा संशय असलेले रघु ऊर्फ रड्या शास्त्री भोसले (रा. पूर्णा) आणि कटप्पा ऊर्फ शीला हनुमंत भोसले (रा. वरणा तांडा, बोरी, ता. जिंतूर) हे दोघे अद्याप फरार आहेत. या कारवाईत पोलिसांनी एकूण १ लाख ४७ हजार ७०० रुपयांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त केला. घरफोडीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत झाल्याने तपासाला महत्त्वपूर्ण दिशा मिळाली.
फरार आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर या गुन्ह्यातील इतर बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तसेच या संशयितांचा अन्य घरफोडीच्या घटनांमध्ये सहभाग आहे का, याचाही तपास पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मधुकर चट्टे, अंमलदार सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, केशव लटपटे, लक्ष्मण कांगणे, रंगनाथ दुधाटे, गजानन क्षीरसागर, हनुमान ढगे, विलास बहुरे यांच्या पथकाने केली. जिल्ह्यातील घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केलेल्या विशेष मोहिमेला या कारवाईमुळे यश मिळाले आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास पूर्णा पोलीस करीत आहेत.