

परभणी जिल्ह्यातील पूर्णा व पालम तालुक्यांच्या सीमेवर, गोदावरी नदीच्या मध्यभागी वसलेले निसर्गरम्य जांभुळबेट हे ठिकाण गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटनाच्या दृष्टीनं महत्त्वाचं मानलं जात आहे. मात्र येथे आवश्यक विकासकामे, सुविधांची उभारणी आणि पर्यटनाचा पाया मजबूत करण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध न झाल्याने प्रकल्प रखडलेले होते. याच पार्श्वभूमीवर जांभुळबेट विकास कार्याला गती देण्यासाठी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री श्री. नितीन गडकरी यांची नागपूर येथे विशेष भेट घेण्यात आली.
या भेटीत जांभुळबेट संवर्धन समितीचे अध्यक्ष कांतराव काका झरीकर, तसेच डॉ. सुशील शिंदे, डॉ. गिरीश चरडे आणि डॉ. लोकेश बेरबोशी उपस्थित होते. जांभुळबेट परिसरातील अडचणी, रखडलेली कामे, पर्यटन विकासाची गरज आणि पर्यावरणीय संवर्धन या सर्व विषयांवर मंत्री गडकरी यांच्यासमोर सविस्तर माहिती मांडण्यात आली.
डॉ. सुशील शिंदे यांनी गडकरींच्या प्रसिद्ध कातायण या पुस्तकाचे वाचन करून तसेच त्यांच्या कार्याचा अभ्यास करून जांभुळबेटसाठी आवश्यक असलेल्या विविध योजनांची माहिती आधीच तयार केली होती. त्यांनी गडकरींना जांभुळबेटचा विकास कसा होऊ शकतो, काय अडचणी आहेत, कोणत्या सुविधा आवश्यक आहेत याबाबत सविस्तर सादरीकरण केले.
गडकरी यांनी जलसंधारण, फळबाग योजना, सेंद्रिय शेती, स्मशानभूमी विकास, आणि जांभुळबेट संवर्धन या सर्व उपक्रमांचे कौतुक केले. त्यांनी जांभुळबेटसाठी आवश्यक निधी आणि तांत्रिक सहकार्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. बैठकीत गडकरींनी जांभुळबेटला भेट देण्याचे आश्वासनही दिले.
कांतराव काका झरीकर यांनी जांभुळबेटचा एकूणच विकास, नदीकाठ संवर्धन, पर्यटकांसाठी सुरक्षित प्रवेशव्यवस्था, पायाभूत सुविधा, स्थानिकांना रोजगाराच्या संधी या सर्व मुद्द्यांवर मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली. जांभुळबेट पर्यटन प्रकल्प पुन्हा उभारी घेण्यासाठी गडकरींकडून योग्य मार्गदर्शन मिळेल, अशी स्थानिकांची अपेक्षा आहे.
या चर्चेला सकारात्मक कल मिळाला असून जांभुळबेटच्या विकासकामांना लवकरच गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पूर्णा व पालम परिसरातील नागरिकांमध्ये या भेटीमुळे आशावाद निर्माण झाला आहे.