

Injured Ritiksha Shelke also passes away during treatment
परभणी, पुढारी वृत्तसेवा : बोरवंड रस्त्यावर असलेल्या उमरी फाट्याजवळ रस्त्यावर उभ्या टिप्परवर कार आदळून झालेल्या भीषण अपघातात आई-वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या मुलीचाही सोमवारी (दि.१२) उपचारा दरम्यान मृत्यू झाला. रितीक्षा रोहित शेळके हिच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, मोठ्या प्रमाणात झालेला रक्तस्राव आणि डोक्यासह मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने उपचार सुरू असतानाच सोमवारी सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली. एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाल्याने शेळके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
परभणी शहरातील मध्यवस्तीतील गांधी पार्क परिसरातील रहिवासी रोहित दिलीपराव शेळके (वय ३८) आणि त्यांच्या पत्नी माधवी रोहित शेळके (वय ३५) हे शनिवारी आपल्या मुलीसह ब्रह्मपुरी येथे गेले होते. तेथील काम आटोपून रात्री ते कारने परभणीकडे परतत होते. यावेळी बोरवंड रस्त्यावर उमरी फाट्याजवळ रस्त्यावरच उभ्या असलेल्या टिप्परवर त्यांच्या कारची पाठीमागून जोरदार धडक झाली.
धडक इतकी भीषण होती की, कारचा पुढील भाग चक्काचूर झाला. या अपघातात रोहित शेळके आणि माधवी शेळके यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची मुलगी रितीक्षा गंभीर जखमी झाली. अपघातानंतर रितीक्षा गंभीर जखमी होऊन कारमध्ये अडकली होती. शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असतानाही तिने धीर न सोडता आपल्या मामाला मोबाईलवर संपर्क साधला.
अपघात झाल्याची माहिती देतानाच आई-वडील आणि आपणही जखमी झाल्याचे तिने सांगितले. ही माहिती दिल्यानंतर काही वेळातच ती बेशुद्ध झाली. रितीक्षाने केलेला हा शेवटचा फोन कुटुंबीयांसाठी आयुष्यभराची वेदना ठरला. अपघाताची माहिती मिळताच प्रत्यक्षदर्शी व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले. मात्र, अपघातात तिच्या डोक्याला आणि मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. तसेच मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तिची प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही तिची प्रकृती सुधारली नाही. सोमवारी दिवसभर रितीक्षाच्या प्रकृतीबाबत कुटुंबीय आणि नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. तिच्या प्रकृतीत सुधारणा होईल, अशी आशा कुटुंबीयांना होती.
मात्र, सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अपघाताच्या ठिकाणीच रोहित व माधवी या दाम्पत्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मृत्यूशी झुंज देत असलेल्या रितीक्षाचाही उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने एका कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेने गांधी पार्क परिसरासह परभणी शहरात शोककळा पसरली आहे. रितीक्षा शेळके हिच्या पार्थिवावर सोमवारी रात्री ८ वाजता जिंतूर रस्त्यावरील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.