

जवळा बाजार परभणी जिल्ह्यातील सेलू येथे 28 नोव्हेंबर 2025 रोजी पार पडलेल्या विभागीय शालेय क्रिकेट स्पर्धेत इंदिरा गांधी कन्या विद्यालयाच्या 17 वर्षांखालील मुलींच्या संघाने शानदार विजय मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान पक्के केले आहे. या उल्लेखनीय विजयामुळे शाळा परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
या विजयी संघाचे नेतृत्व कर्णधार राधिका थोरवट हिने केले असून उपकर्णधार ईश्वरी तेरसे हिच्या दमदार कामगिरीने संघाला भक्कम आधार मिळाला. याशिवाय पुनम चव्हाण, सुप्रिया आटकोरे, श्रद्धा जाधव, संगीता जाधव, अक्षरा वंजे, समृद्धी देशपांडे, अनुष्का लोधी, भाग्यश्री बोरगड, श्रेया राखोंडे, श्रावणी टिकायत, तपस्या वासरे, गरिमा कासलीवाल, शमीका वाईकर आणि प्रार्थना कुर्ऱ्हे यांनीही उत्कृष्ट खेळ करत संघाचे बळ वाढवले. संघाच्या यशामध्ये मार्गदर्शक शिक्षक गोविंद मुळे यांचे महत्त्वाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले.
या विजयाबद्दल बाराशिव हनुमान ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ (बाराशिव शाखा) यांच्या वतीने स्थानिक अध्यक्ष मुरलीधर अण्णा मुळे आणि मुख्याध्यापक उद्धवराव राखोंडे यांनी विजयी मुलींना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
तसेच आगामी शिर्डी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींचे कौतुक करत त्यांचा उत्साह वाढवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री. बापूराव शिरसे यांनी केले.