

Illegal sand stockpile worth Rs 3 crore 35 lakh, vehicles seized in Pimpalgaon
बोरी, पुढारी वृत्तसेवा: जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव गायके परिसरातील दूधना नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा, साठा व वाहतूकीवर बोरी पोलिसांनी सोमवारी पहाटे धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 3 कोटी 35 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून, मुख्य आरोपी रमेश पंडितराव गीते याच्यासह 17 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
बोरी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दूधना नदीपात्रात अवैध वाळू खोदकाम सुरू असल्याची खात्री पटली. त्यानुसार, पोलिसांनी मोठे पथक तयार केले आणि पहाटे अचानक छापा टाकला. पोलिसांच्या या अचानक कारवाईमुळे रेती तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली. अनेक महिन्यांपासून येथे अवैध उपसा आणि वाहतूक सुरू असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.
जप्त केलेल्या मुद्देमालाचा तपशील
कारवाईदरम्यान पोलिसांनी अवैध रेती उपशासाठी वापरली जाणारी मोठ्या क्षमतेची यंत्रसामग्री, वाहने आणि रेतीसाठा असा मोठा माल ताब्यात घेतला. जप्त केलेल्या मुद्देमालाचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
ही मोठी कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनात यशस्वी झाली. सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल, सपोनि रामेश्वर धोंडगे, पोलिस उपनिरीक्षक महादेव गायकवाड, जगदीश म्हेत्रे, बप्पासाहेब झिंजुर्डे आणि बोरी ठाण्यातील पथकाने ही कारवाई केली.
नागरिकांकडून अवैध धंद्यांवर कारवाईची मागणी
स्थानिक नागरिकांच्या मते, बोरी व परिसरात मटका, जुगार, गुटखा, दारू विक्री आणि वाळू तस्करी यांसारखे अन्य अवैध व्यवसाय गुपचूप सुरू असल्याची चर्चा आहे.
या अवैध धंद्यांवरही पोलिसांनी अधिक कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. जिल्हा पोलीस दल अवैध रेती उपशाविरोधात सातत्याने मोहीम राबवत असून, नागरिकांनी कुठेही अवैध व्यवसाय, तस्करी किंवा गुन्हेगारी प्रकार दिसल्यास तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला किंवा जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती देण्याचे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे.