

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: गौर येथील महादलिंग स्वामी मठ देवस्थानची गौर शिवारात गट नं. ४०२ मध्ये ३८ एकर जमीन आहे. या जमिनीपैकी १० एकरमध्ये कोणतीही परवानगी न घेता उत्खनन करून मोठी खदान केली आहे. याबाबत वसमत येथील लासीन मठ संस्थानचे अध्यक्षांनी समृध्दी महामार्गाची बांधणी करणाऱ्या मोंटोकार्लो ठेकेदार कंपनीसोबत करारनामापत्र केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या जमिनीत उत्खनन करुन ४० हजार ब्रास गौणखनिज काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पूर्णा तालुक्यात खळबळ उडाली आहे. (Parbhani News)
या प्रकरणी तहसीलदार यांनी विनापरवाना उत्खनन करणाऱ्या ठेकेदार कंपनीविरुद्ध कोणतीही कारवाई केल्याची माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे गौर येथील महादलिंग स्वामी मठ देवस्थानचे भक्तगण आणि नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. (Parbhani News)
दरम्यान, वसमत येथील लासीन मठ संस्थानचे अध्यक्ष तथा मठाधिपती श्री करबसय्या गुरु ईश्वरय्या यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला असता ते म्हणाले की, गौर शिवारातील गट नं.४०२ मधील एकूण जमिनीपैकी १० एकर खडकाळ जमीन मोंटोकार्लो कंपनीला सुरुवातीला पार्किंगसाठी दिली होती. त्यानंतर १० एकर जमिनीतील दगड, खडक काढण्यासाठी करारनामा केला होता. खोदकाम करुन मोठे शेततळे तयार करुन त्यात पाणी साठवून उर्वरित जमीन सिंचनाखाली आणण्याची योजना मठाची होती. पिकांच्या उत्पन्नातून मिळालेला पैसा मठाचे बांधकाम, रंगरंगोटी, मठाचे विविध कार्यक्रमांसाठी खर्च करण्यात येणार होता. देवस्थानची जमीन ही पडीक होती. ती खडकाळ भुरकट हलक्या प्रतीची असल्यामुळे तेथे पिके येत नव्हती. त्यामुळे त्या जमिनीचा कोणताच उपयोग होत नव्हता. त्यामुळे काही उत्पन्न मिळेल, या हेतूने ही जमीन खोदकाम करण्यासाठी ठेकेदार कंपनीसोबत करार करण्यात आला होता. कराराप्रमाणे काही रक्कम मठाच्या बँक खात्यात जमा झालेली आहे.
परंतु, जमीन कंपनीला दिल्याने समाजाच्या भावना तीव्र आहेत. नागरिक, भक्तगणांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. जमीन ही सार्वजनिक असून त्यांचा त्यावर हक्क आहे. परंतू त्या जमिनीतून उत्पन्नच मिळत नसल्यामुळे जमीन खदानीला देण्याचा मोठा निर्णय घेतला होता, असे स्पष्टीकरण मठाच्या अध्यक्षांनी दिले आहे.
गौर शिवारातील गट क्रमांक ४०२ मध्ये मोंटोकार्लो कंपनीने विनापरवाना अवैध उत्खनन करुन ३५ ते ४० हजार ब्रास गौनखनिज काढले आहे. तलाठी व मंडल अधिकारी यांनी पंचासमक्ष पाहणी करुन पंचनामा केला होता. पंचनाम्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठवला होता. परंतू, कारवाई करण्यासाठी अद्याप आदेश आलेला नाही. तरीही कंपनीच्या क्रशर स्टेशनचा विद्युत पुरवठा खंडित करून उत्खनन बंद करण्यात येऊन सील केले आहे.
- माधवराव बोथीकर, तहसीलदार, पूर्णा