

परभणी : शहरातील मॉडेल उर्दू हायस्कूल येथील शिक्षकाला एप्रिल ते सप्टेंबर २०२४ या सहा महिन्याचे प्रलंबित वेतन मिळाले. त्यातून एका महिन्याचे ३ हजार असे ६ महिन्याचे एकूण १८ हजार रुपये मुख्याध्यापिका सिद्दिकी अहेमदी यांनी मागितले. ही रक्कम तक्रारदार शिक्षकांनी शाळेत नेली असता मुख्याध्यापिकेने तेथील लिपिक बुढन खान महेबुब खान पठाण त्याच्याकडे देण्यास सांगितले. सदर रक्कम स्वीकारताना प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
शहरातील मॉडेल उर्दू हायस्कूल येथील तक्रारदार शिक्षिका दि.१७ मार्च रोजी त्यांच्या वर्गात पर्यवेक्षणाचे काम करत होत्या. यावेळी त्यांना शाळेतील लिपिक बुढन खान महेबुब खान पठाण यांनी वर्गात येऊन तुम्हाला एप्रिल ते सप्टेंबर २०२४ या कालावधीतील सहा महिन्याचे प्रलंबित असलेले वेतन मिळालेले आहे, त्या वेतनातून तुम्ही आम्हाला प्रति ३ हजार याप्रमाणे सहा महिन्याचे १८ हजार रुपये द्यावे हे पैसे मुख्याध्यापिका श्रीमती सिद्दिकी अहेमदी मोहम्मद अब्दुल मजीद यांनी मागितले असे सांगितले. तक्रारदाराने मुख्याध्यापिका यांची भेट घेतली असता त्यांनी पैसे द्यावे लागते असे म्हटले.
तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दि. १७ मार्च रोजी तक्रार दाखल केली. या विभागाने तक्रारीची पडताळणी दि.१८ मार्च रोजी केली केली असता तक्रारदाराने संबंधिताकडे लाचेची रक्कम कमी करण्याची विनंती केली पण मुख्याध्यापिका यांनी तुम्हाला ठरलेले १८ हजार रुपये द्यावे लागतील असेच सांगितले. यातच बुधवारी (दि.१९) सापळा लावला. यावेळी तक्रारदार सदर शाळेत दाखल झाल्या. पण मुख्याध्यापिका सिद्धिकी यांनी ही रक्कम लिपिक बुढन खान पठाण त्यांच्याकडे देण्यास सांगितले. बुडन खान यांना हिला स्वीकारताना एसीबच्या पथकाने रंग्यात पकडले व मुख्याध्यापिका सिद्दिकी अहेमदी यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई एसीबीच्या नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.संजय तुंगार यांच्या मार्गदर्शनात सापळा अधिकारी परभणीचे पोलीस उपाधीक्षक अशोक इप्पर, निरीक्षक अल्ताफ मुलाणी, बसवेश्वर जकीकोरे, फौजदार निलपत्रेवार, पोह सीमा चाटे, अंमलदार अतुल कदम, कल्याण नागरगोजे, शाम बोधनकर, राम घुले, नामदेव आदमे, चापोह जे.जे.कदम, नरवाडे आदींनी केली.