

Horrific Truck-Car Accident; One Dead
एरंडेश्वर, पुढारी वृत्तसेवा :
परभणी-वसमत मार्गावरील झिरो फाटा येथे रविवारी (दि.२९) दुपारी ३ वाजेच्या सुमारास ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला. श्रीराम विठ्ठलराव भिसे (रा. शिवदत्त नगर, नांदेड) असे अपघातात मयत झालेल्या प्रवाशाचे नाव आहे.
या विषयी मिळालेल्या माहितीनुसार, श्रीराम भिसे वसमतकडून परभणीकडे कारने (क्रमांक एमएच २६, सीई २३६९) जात होते. तर परभणीहून वसमकडे ट्रक (क्रमांक एमएच- २६, एच - ५५२६) जात होता. या दोन्ही वाहनांची समोरा समोर जोराची धडक झाली.
हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. या अपघातात कारमधील श्रीराम भिसे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चालक व अन्य प्रवासी जखमी झाल आहेत. प्रवाशांचा जीव धोक्यात आला.
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पूर्णा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास गोबाडे, उपनिरीक्षक एस. एस. पडलवाड, पोलिस शिपाई सुधीर काळे, तसेच एरंडेश्चरचे पोलिस पाटील बापूराव राऊत यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त जखमींना रुग्णालयात दाखल केले. यावेळी अपघातामुळे झिरो फाटा परिसरात काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलीसांनी तातडीने रस्त्यावरील वाहनांची गर्दी हटवून वाहतूकीसाठी रस्ता मोकळा करत वाहतूक सुरळित केली.