

परभणी : जिल्हयात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. १८ सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे ठरले. मात्र अद्यापही मोठ्या प्रमाणात शेतकरी शासन मदतीपासून वंचित आहेत. शासनाने १२८५.५४ कोटींच्या मदतीचे नियोजन केले असले, तरी त्यापैकी केवळ ९७२.०१ कोटींचे वाटप पोर्टलवरून मंजूर झाले. उर्वरित ३१३.५२ कोटींची रक्कम अद्यापही पोर्टलवर अपलोड व मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे.
दि.१४ ऑक्टोबरपर्यंतच्या जिल्हास्तरीय अहवालानुसार, एकूण २,३८,५३० शेतकरी बाधित झाले असून, त्यांचे १,५१, २२२ हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त झाले आहे. अनेक तालुक्यांमध्ये मंजुरीची प्रक्रिया रखडल्यामुळे अनेक शेतकरी अजूनही आपल्या खात्यावर मदतीची रक्कम येण्याची वाट पाहत आहेत. काही शेतकरी म्हणाले, नुकसान झाले त्याला दोन महिने उलटले, आता रब्बी हंगाम सुरू होतोय, बियाणे, खते, मशागतीसाठी भांडवल नाही. सरकारने मदत त्वरीत दिली नाही, तर यंदा रब्बी हंगामात पुन्हा अडचण येईल असे भावनिक मत मांडले आहे. जिल्हा
प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले की, बाधित क्षेत्र आणि शेतकऱ्यांची यादी महा आय.टी. पोर्टलवर वेळोवेळी अपलोड केली जात आहे. काही तालुक्यांमध्ये पुर्नमुल्यांकनाच्या प्रक्रियेमुळे उशीर झाला आहे. उर्वरित रक्कम मंजूर होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे म्हटले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचे वितरण ७५ टक्क्यापर्यंत पोहचले असले तरी, अद्यापही ३१३ कोटींहून अधिक रक्कम वितरणापासून वंचित राहिलेली आहे. राज्य शासनासह जिल्हा प्रशासनाने याबाबत गांभीयनि लक्ष घालून उर्वरित राहीलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदतीचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज बनलेली आहे.
मदतीची वाट
परभणी तालुक्यातील १२,२४३ शेतकऱ्यांना ५९१४२५९२.००, सेलू तालुक्यातील ६,४१९ शेतकऱ्यांना २२७९६२००,००, पाथरी तालुक्यात १४,३२१ शेतकऱ्यांना ६९४९०४७३.००, सोनपेठ तालुक्यात ६,९७२ शेतकऱ्यांना ५५४९६८७०,००, पालमला १२,४८४ शेतकऱ्यांना ४९८११३५२.००, पूर्णा १४,६०९ शेतकऱ्यांना ५६७८९०६९.०० रक्कमेची वाट पाहावी लागत आहे.
तालुकानिहाय मदत वाटपाचा आढावा
जिल्हयातील २ लाख ३८ हजार ५३० शेतकऱ्यांचे १ लाख ५१ हजार २२ हेक्टरहून अधिक क्षेत्रावर अतिवृष्टी व पुरामूळे नूकसान झालेले आहे. यात पोर्टलवरून व जिल्हास्तरावरील मान्यतेतून १ लाख ७१ हजार ४८२ शेतकऱ्यांना ९७२ कोटी १ लाख १३ हजार १४ रूपयांचे वाटप करण्यात आलेले आहे. तसेच ३१३ कोटी ५२ लाख ६५ हजार ५६ रूपयांची रक्कम अजुनही वाटप करणे शिल्लक राहिलेले आहे. यामध्ये परभणी तालूक्यात आतापर्यंत १९,३६० शेतकऱ्यांना १०३ कोटी ५२ लाख २४ हजार, सेलू तालुक्यात २४,२९५ शेतकऱ्यांना १४५ कोटी ९९ लाख ८५ हजार, पाथरीत ३०,०८८ शेतकऱ्यांना १९३ कोटी ९२ लाख ८५ हजार, सोनपेठमध्ये २२,५१८ शेतकऱ्यांना १४८ कोटी १८ लाख ८८ हजार, पालमला ३२,८६० शेतकऱ्यांना १८३ कोटी ३४ लाख ३६ हजार तर पूर्णा तालुक्यातील ४२,३६१ शेतकऱ्यांना १९७ कोटी २ लाख ९४ हजारांचे वाटप पोर्टलवरून करण्यात आले.