

जिंतूर: आंबेडकरी चळवळीतील सक्रिय असलेले जिंतूर तालुक्यातील युवा नेतृत्व गणेश गुलाबराव काकडे यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नामदार मेघनादिदी बोर्डीकर यांच्या हस्ते हा प्रवेश पार पडला.
ज्येष्ठ नेते रामप्रसाद बोर्डीकर, अविनाश भाऊ काळे, भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेशराव भुमरे, भाजपा तालुका अध्यक्ष गोविंद मामा थिटे, नानासाहेब राऊत, राजेंद्रजी नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली काकडे यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला.
या प्रवेशामुळे पक्षकार्याला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नामदार सौ. मेघनादिदी बोर्डीकर यांच्या कार्यपद्धतीला व विचारांना प्रभावित होऊन त्यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
समाजकार्याच्या विकासाचा हा प्रवास आता नव्या ऊर्जेने आणि नव्या संघटनशक्तीच्या साथीने सुरू होईल, अशा भावना त्यांनी प्रवेशादरम्यान व्यक्त केल्या.
दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना, भाजपमध्ये अन्य पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रवेश घेत आहेत. सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये 'इन्कमिंग' जोमात सुरू असल्याने, एकूणच भाजपला मोठी बळकटी मिळत असल्याचे दिसून येत आहे.