

पूर्णा : तालुक्यातील आडगाव-सुगाव येथे अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याने आणि बँकेच्या पीक कर्जाच्या ताणाला कंटाळून एका ५० वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना शनिवारी (दि. ११) रात्री उघडकीस आली. रामराव किशनराव पिडगे (वय ५०, रा. आडगाव-सुगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पिडगे यांच्या आडगाव-लासिना शिवारात सुमारे तीन ते चार एकर शेती आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतातील खरीप पिक पूर्णपणे नष्ट झाले. याच जमिनीवर त्यांनी राष्ट्रीयकृत बँकेचे पीक कर्ज घेतले होते. पिकांचे नुकसान झाल्याने कर्जफेडीचा ताण वाढला होता. या आर्थिक संकटामुळे आणि अतिवृष्टीच्या फटक्यामुळे ते नैराश्यात गेले होते.
शनिवारी रात्री त्यांनी राहत्या घरी खिडकीच्या आडोशाला गळफास लावला. या घटनेची माहिती मिळताच चुडावा पोलिस ठाण्याचे सपोनि सुशांत किनगे आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. पिडगे यांच्या पश्चात आई, पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे. या घटनेमुळे आडगाव-सुगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
पूर्णा तालुक्यातील दुसरी घटना
अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने याआधी ४ ऑक्टोबररोजी मरसूळ येथील शेतकरी चांदू काशिराम शिंदे यांनी धावत्या रेल्वेसमोर उडी मारली होती. आता आडगाव-सुगाव येथील ही दुसरी घटना घडल्याने शेतकऱ्यांमधील अस्वस्थता अधिक वाढली आहे.