Modern Agriculture : पाच शेतकऱ्यांना युरोप-चीनमध्ये आधुनिक शेती अभ्यासाची मिळणार संधी

राज्य पुरस्कृत विदेश अभ्यास दौरा योजनेसाठी १३ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
Modern Agriculture
Modern Agriculture : पाच शेतकऱ्यांना युरोप-चीनमध्ये आधुनिक शेती अभ्यासाची मिळणार संधी file photo
Published on
Updated on

Five farmers will get an opportunity to study modern agriculture in Europe-China

परभणी, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शेतकऱ्यांना जागतिक स्तरावरील आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची ओळख करून देणे, उत्पादन वाढीसाठी नाविन्यपूर्ण शेती पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे आणि कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, या उद्देशाने राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत देशाबाहेरील अभ्यास दौरे - राज्य पुरस्कृत योजना (2026-27) राबविण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत जिल्ह्यास पाच शेतकऱ्यांचा लक्षांक प्राप्त झाला असून, इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी 13 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केले आहे.

Modern Agriculture
Parbhani ZP | वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर; जिल्हा परिषद कर्मचाऱ्याचे निलंबन

शेतकऱ्यांना विकसित देशांमधील आधुनिक शेती, उत्पादन वाढीची अत्याधुनिक तंत्रे, कृषी संशोधन, यांत्रिकीकरण, सेंद्रिय शेती, फलोत्पादन आणि कृषी उद्योग यांचा प्रत्यक्ष अभ्यास करता यावा, यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. या अभ्यास दौन्याचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शेतकरी आपल्या परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देऊ शकतील, असा शासनाचा उद्देश आहे.

यंदाच्या अभ्यास दौऱ्यासाठी युरोप आणि चीन या देशांची निवड करण्यात आली. युरोपमधील फलोत्पादन, उच्च दर्जाचे दुग्धोत्पादन, सेंद्रिय शेती, पाणी व्यवस्थापन, मूल्यवर्धन आणि कृषी प्रक्रिया उद्योगांचा अभ्यास करण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर चीनमध्ये अत्याधुनिक कृषी यंत्रसामग्री, स्मार्ट शेती, पीक उत्पादकता वाढविणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर, कृषी संशोधन संस्था तसेच आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनांना भेट देण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

Modern Agriculture
Pension Scheme : बांधकाम कामगारांना मिळणार ६० वर्षांनंतर निवृत्तीवेतन !

त्यामुळे परदेशातील यशस्वी कृषी मॉडेल्सचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्याचा उपयोग स्थानिक शेतीमध्ये करता येणार आहे. योजनेसाठी प्राप्त होणाऱ्या अर्जाची छाननी करून पात्र अर्जदारांची निवड सोडत पद्धतीने व ज्येष्ठता यादीनुसार केली जाणार आहे. निवड प्रक्रियेत किमान एका महिला शेतकऱ्याचा समावेश अनिवार्य असून, केंद्र किंवा राज्य शासनाचा कृषी पुरस्कार प्राप्त अथवा पीक स्पर्धेतील विजेत्या एका शेतकऱ्यालाही संधी दिली जाणार आहे.

त्यामुळे गुणवंत आणि प्रगतशील शेतकऱ्यांना प्राधान्य मिळणार आहे. या योजनेसाठी अर्ज करणारा व्यक्ती स्वतः शेतकरी असणे आवश्यक आहे, त्याच्या नावावर अद्ययावत 7/12 व 8-31 उतारा, अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी, वैध पासपोर्ट, आधार कार्ड, शिधापत्रिका, तसेच एमबीबीएस डॉक्टरांचे शारीरिक तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.

अभ्यास दौऱ्याच्या दिवशी अर्जदाराचे वय किमान 25 वर्षे पूर्ण झालेले असावे. तसेच अर्जदार शासकीय, निमशासकीय, सहकारी किंवा खासगी सेवेत कार्यरत नसावा. यापूर्वी शासनाच्या आर्थिक सहाय्याने विदेश अभ्यास दौऱ्याचा लाभ घेतलेला नसावा, अशीही अट घालण्यात आली आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी कृषी आयुक्तालयाने निर्धारित केलेले प्रपत्र क्रमांक 1, 2, 3 व 5 भरून सर्व आवश्यक कागदपत्रांसह संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्रस्ताव द्यावे. तेथून ते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहेत. लाभार्थ्यांच्या अंतिम निवडीचे अधिकार राज्यस्तरीय समितीकडे राखीव ठेवलेले आहेत.

परदेशातील आधुनिक शेती पद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव, अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती, उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्याच्या उपाययोजना आणि कृषी क्षेत्रातील नव्या संधी जाणून घेण्यासाठी ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता आवश्यक कागदपत्रांसह वेळेत अर्ज सादर करून या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news