

farmers cattle stealing Gang arrested, worth Rs 10 lakh seized
परभणी, पुढारी वृत्तसेवा :
परभणीसह जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेळ्या व म्हैस चोरणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करत परभणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन वाहनांसह एक म्हैस, विक्री केलेल्या शेळ्यांचे १.३५ लाख रुपये असा एकूण सुमारे १० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा व ताडकळस पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.
गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, संशयित पिराजी अंबादास धबडगे (वय ५०, रा. मिरखेल, ता. परभणी) आणि त्याचा साथीदार गजानन रंगनाथराव धबडगे (वय ३६, रा. मिरखेल) हे दोघे मिळून परभणी व जालना जिल्ह्यातून जनावरांची चोरी करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थागूशाच्या पथकाने साखळा प्लॉट, परभणी येथे सापळा रचून त्यांना अटक केली.
चौकशी दरम्यान संशयित आरोपींनी परभणी जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून शेळ्या तर जालना जिल्ह्यातून एक म्हैस चोरल्याची कबुली दिली आहे. त्यांनी गुन्ह्यात महिंद्रा मॅक्स पिकअप (क्र. MH 22 AA 3543) आणि क्रुझर जीप (क्र. MH 12 GV 7961) या दोन वाहनांचा वापर केल्याचेही उघड झाले आहे.
पोलिसांनी केलेल्या तपासात चार पोलीस ठाण्यांमध्ये जनावरे चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. यात ताडकळस, सोनपेठ, गंगाखेड, परतूर (जि. जालना) या ठाण्यात चोरीचे गुन्हे नोंद आहेत. पोलिसांनी संबंधित चोराकडून चोरलेली १ म्हैस, विक्री केलेल्या शेळ्यांमधून मिळालेले १ लाख ३५ हजार रुपये, महिंद्रा मॅक्स पिकअप व क्रुझर जीप – गुन्ह्यात वापरलेली वाहने असा एकूण ९ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक पी.डी. भारती, अंमलदार सुग्रीव केंद्रे, मधुकर चटटे, निलेश भूजबळ, लक्ष्मण कागणे, पांडूरंग तूप सुंदर, निलेश परसोडे, परसराम गायकवाड, रफीयोददीन, मूदीराज, हुसेन पठाण आणि उत्तम हनवते यांनी केली.