पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : शहरासह तालुका परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची दैणा उडाली आहे. या धर्तीवर रविवारी आणि सोमवारी विजेच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस पडला. पाऊसाचे हवामान कायम होते तर १९ अक्टोबर रोजी मध्यरात्रीनंतर देखील २ वाजेपासून पहाटे ४ वाजेपर्यंत मुसळधार पाऊस पडला. या परतीच्या अवकाळी पाऊसामुळे शेतात कापून टाकलेल्या काही शेतक-यांच्या सोयाबीन कडप्या पाण्याखाली जावून त्याची नासाडी झाली. तसेच वेचनीला आलेल्या पांढरा शुभ्र कापूस झोडपून त्याच्या वाती झाल्या. हा परतीचा पाऊस सोयाबीन व कापूस पिकाचा कर्दनकाळ तर तूर, हळद,ऊस पीकासाठी वरदान ठरत आहे. शिवाय या पाऊसामुळे पुढील काळात रब्बी हंगाम जोमात येणार असल्याचे शेतकरी बोलून दाखवत आहेत.
मात्र ज्या काही शेतक-यांनी सध्या सोयाबीन पीक कापणी करुन ते जमा करत असताना त्यातच पावसाने अचानक गाठून त्याची नासाडी केली.जमा करुन ठेवलेल्या सोयाबीन सुडीत पाणी शिरुनही नुकसान झाले.अशा नुकसानग्रस्त सोयाबीन व कापूस पिकाचे काढणीपश्चातचे पिक विमा क्लेम मंजूर करुन शेतक-यास आय सी आय सी आय लोम्बार्ड पिक विमा कंपनीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.