रायगड जिल्ह्यालगतच्या पानशेत, वरसगाव खोर्यासह सिंहगड मुठा भागात गेल्या दोन आठवड्यांत पडत असलेल्या परतीच्या पावसामुळे खडकवासला धरणसाखळी शंभरीवर कायम आहे.
आज बुधवारी (दि. 16) सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीत 28.99 टीएमसी म्हणजे 99.44 टक्के पाणीसाठा होता. ऑक्टोबर महिन्यात प्रथमच धरणसाखळी तुडुंब भरल्याने पुणे शहर व परिसरातील एक कोटी नागरिकांसह जिल्ह्यातील दौंड, हवेली, इंदापूर आदी तालुक्यांतील 66 हजार हेक्टर शेतीला लाभ होणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात धरणसाखळीत क्षमतेपेक्षा दुपटीहून अधिक 65 टीएमसी पाणी जमा झाले आहे.
त्यातील 33.35 टीएमसी जादा पाणी खडकवासलातून 24 जुलैपासून आजपर्यंत मुठा नदीत सोडण्यात आले. या पाण्याचा लाभ उजनी धरणाला झाला आहे, तर याच कालावधीत 10 टीएमसीपेक्षा अधिक पाणी पुणे शहर व परिसराला जिल्ह्यातील शेतीला सोडण्यात आले, तर 25 टीएमसीपेक्षा अधिक पाणी यंदाच्या हंगामात धरणसाखळीत साठले आहे.
पानशेतसह चारही धरणक्षेत्रात परतीचा पाऊस सक्रिय असून, पावसाळी वातावरण कायम आहे. तुरळक पावसासह दापसरे, तव, धामण ओहोळ, शिरकोली भागात वादळी पाऊस कोसळत आहे. डोंगरकडे नद्या, ओढे-नाल्यांतून पाण्याची आवक सुरू झाली आहे, त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात चारही धरणे तुडुंब भरली आहेत.